अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः उजनी धरणातून (Ujani Dam) सोलापूर शहर (Solapur City) आणि जिल्ह्यातील नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांसाठी भीमा नदीतून (Bhima River) ३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता टप्प्या-टप्प्याने त्यात वाढ करून ते सहा हजार क्युसेक करण्यात आले आहे.
कालवा पाणी वाटप मंडळाने ठरवलेल्या पूर्व नियोजनानुसार हे पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी (ता. १९) सकाळी अकरा वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पामधून १६०० क्युसेक आणि त्यानंतर धरणाचे दोन दरवाजे एक फूटाने उचलून त्यातून १४०० क्युसेक असे एकूण ३००० हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
पण रात्री उशिरा पुन्हा ते सहा हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आले आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेपर्यंत टाकळी बंधाऱ्यापर्यंत उजनी धरण ते हा बंधारा हे अंतर जवळपास २३२ किलोमीटर असून, उजनी धरणातून सोडलेले भीमा नदीत सोडलेले पाणी टाकळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नऊ ते दहा दिवस लागणार आहेत.
नदीपात्रातून सोडलेल्या या पाण्याचा उपयोग सोलापूरसह भीमा नदीकाठच्या सुमारे १२५ हून अधिक नळ पाणीपुरवठा योजनांनाही होणार आहे.
नदीकाठचा वीजपुरवठा बंद
या पाण्याद्वारे सोलापूरनजीकचे टाकळी आणि चिंचपूर बंधारे भरून घेतले जाणार आहेत. हे दोन्ही बंधारे भरल्यानंतर सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा जवळपास दोन ते अडीच महिन्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
उजनी धरणातील पाणी थेट या बंधाऱ्यापर्यंत वेगाने पोहोचावे, त्यात अडथळा येऊ नये, यासाठी भीमेच्या नदीपात्रातून शेतीसाठी उचल पाणी घेणाऱ्या वीजपंपांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
धरणात ५२.८५ टक्के पाणीसाठा
उजनी धरणाची पाणी पातळी वरचेवर कमी होत असून, धरणातील पाण्याची एकूण पातळी ४९४.४७५ मीटर इतकी आहे. तर पाण्याचा एकूण साठा ९१.९७ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा २८.३१ टीएमसी आहे आणि या पाण्याची टक्केवारी ५२.८५ टक्के आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.