
Roha News : तालुक्यातील अनेक गावांत तीन-चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. वाशी आणि तळाघर ग्रामपंचायतीतील गावांत तर हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते.
काहीजण रोख पैसे मोजून दुचाकीवरून शहरातून पाणी आणत आहेत. त्यामुळे फायजीचे नेटवर्क मिळाले पण पिण्याचे पाणी नॉट रिचेबल झाल्याची अवस्था ग्रामीण भागांत आहे.
तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱ्या वाशी आणि तळाघर ग्रामपंचायतीमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र ते पाणी ना पिण्यासाठी पुरत ना दैनंदिन वापरासाठी.
दोन गावांमध्ये धाटाव एमआरडीसीने ५० एमएमचे केवळ एक कनेक्शन दिले आहे, मात्र ग्रामपंचायतीतील सहा गावे आणि काही वाड्यांसाठी हा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.
वाशी ग्रामपंचायतीमधील अंतर गावासाठी ६४ लाख रुपये खर्चून जलजीवन मिशनअंतर्गत योजनेचे काम सुरू करण्यात आले, मात्र त्याची रखडपट्टी सुरू आहे. योजनेचे काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.
तहसील कार्यालयासमोर उपोषण
तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांचीदेखील हीच अवस्था असून वैशालीनगर, बौद्धवाडीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी खर्च केला, परंतु निकृष्ट दर्जाच्या जलवाहिन्या टाकल्याने ही योजना रखडली आहे, असा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष संदेश गायकवाड यांनी केला.
याविरोधात आवाज उठवल्यानंतर तत्कालीन तहसीलदार कविता जाधव यांनी दोन तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनदेखील हवेत विरल्याने संतप्त गावकऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.