Alibaug Water News : भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने जिल्ह्याच्या किनारी भागात पाणी टंचाईचे संकट वाढत आहे. मुरूड, तळा तालुक्यातील पातळीत ०.१६ मीटर इतकी घट झाली आहे. अलिबाग, उरण, श्रीवर्धन या तालुक्यांमध्येही फारशी समाधानकारक स्थिती नाही.
यामुळे भविष्यात पिण्यासह शेती, फळ लागवड, फुलशेती, कडधान्य लावगडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीची स्थिती दर्शवली असून खारेपाण्याचे क्षेत्रही वाढत आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ५२ विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास केला, यात ४४ ठिकाणी पाणीपातळी खालावल्याचे तर आठ विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे आढळले.
भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी सरकारच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारे, यासारखे उपक्रम राबवले जातात; परंतु अद्याप सकारात्मक परिणाम दिसत नाही. अशीही काही गावे आहेत तिथे पाण्याची पातळी मागील पाच वर्षाच्या निच्चांकी सरासरीवर गेली आहे. यात तळा आणि मुरूडमधील गावांचा समावेश आहे.
किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये काही अंतरावर बोअरवेल्सना पाणी लागत असले तरी ते खारे असल्याने पाण्याची समस्या गंभीर होत आहे. वाढलेल्या भूजल पातळीचा किनारपट्टीलगतच्या नागरिकांना उपयोग होत नसल्याने येथेही पिण्याचा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजलपातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे.
या वर्षी पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या १५ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांमध्ये ०.३१ मीटरपर्यंत पाणी पातळी वाढली आहे, तर सुधागडमध्ये १.२९ मीटर इतकी सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.
तर अलिबाग तालुक्यातील बेलकडे, कर्जत तालुक्यातील आंबिवली, धामोटे, पेण तालुक्यातील उंबर्डे,महाड तालुक्यातील कोंझर, पोलादपूर शहर या ठिकाणी पाणीपातळीत सरासरीपेक्षा जास्त घट झाली आहे.
तालुकानिहाय जलस्तर
तालुका / पातळी (मीटर)
अलिबाग - ०.२२
उरण - ०.१७
पनवेल- ०.२९
कर्जत - ०.४७
खालापूर - ०.५५
पेण - ०.१४
सुधागड - १.२९
रोहा - ०.५३
माणगाव- ०.२२
महाड - ०.४८
पोलादपूर- ०.४६
म्हसळा- ०.१२
श्रीवर्धन - ०.११
मुरूड - (- ०.१९)
तळा - (-०.१४)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.