खापर, जि.नंदुरबार ः अक्कलकुवा शहरासह तालुक्याच्या काही भागांत नुकतीच पावसाने (Rainfall) हजेरी लावली. काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान, गुरुवारी दिवसभर शहर व परिसरात ढगाळ हवामान (Cloudy Weather) होते, त्याचबरोबर वातावरणातील गारठाही (Cold Weather) वाढला. या वादळाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील पाच सात दिवस कधी ढगाळ हवामान, तर कधी जोराचा वारा असे हवामान पाहायला मिळाले. रात्री उशिरा मात्र अक्कलकुवा शहरासह मोलगी, खापर व तालुक्यातील अन्य ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पिकांसाठी मात्र हे वातावरण पोषक आहे.
सध्या ऊसतोडणीबरोबरच लागवडीचा हंगाम सुरू आहे. त्याचबरोबर काही भागांत उन्हाळी गहू, हरभरा, मक्याची लागण सुरू आहे. या पिकांच्या वाढीसाठी हे वातावरण पूरक आहे. कडक उन्हाळा असेल तर तोड झाल्यानंतर उसाच्या वजनात घट होते. सर्वसाधारणपणे ऊस तुटल्यानंतर किमान बारा तासांनी त्याचे गाळप होते, उन्हाळा असेल तर या काळात वजन घटते, पण सध्याच्या हवामानाचा उसावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, असे सांगण्यात आले.
प्रचारावर परिणाम
अवकाळी पावसामुळे ऊसतोडणीसह ग्रामपंचायत प्रचारावर परिणाम झाला आहे. प्रचारासाठी बाहेर पडलेले उमेदवार आणि कार्यकर्ते यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. रात्री बारानंतर पडलेल्या पावसाने परिसरात अनेक अडचणी निर्माण केल्या. बुधवारी रात्री अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागांत किरकोळ पाऊस झाला. परिणामी गती घेतलेली ऊसतोडणी थांबवावी लागली. रात्री बारानंतर पावसाने जोर धरला. ग्रामपंचायतीच्या रंगांत आलेल्या प्रचारावर परिणाम झाल्याचे दिसून येते.
ऊसतोडणीत व्यत्यय
परिसरात अवकाळी पावसाने बुधवारी रात्री हजेरी लावली. अक्कलकुवा, खापर, मोलगी, होराफली आदी गावांत हा पाऊस झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास पाऊस सुरू झाला. पावसामुळे ऊसतोडणीसह शेतीच्या मशागतीच्या कामात व्यत्यय येणार आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मजुरांचे हाल झाले. शिवारात सरीमध्ये पाणी साचल्यामुळे ऊसतोडणीचे काम बंद राहणार आहे. तसेच उसाच्या लागणीसाठीही व्यत्यय येणार आहे. अर्धवट असलेल्या ऊसतोडण्या सुमारे तीन ते चार दिवस पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.