
Solapur News : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण (Ujani Dam) आता तळ गाठू लागले आहे. ५० दिवसांत तब्बल ३० टीएमसी पाणी संपले आहे. मागील दोन महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून (Irrigation Scheme) पाणी सोडणे सुरूच आहे.
गतवर्षी १२ जूनला उणेमध्ये गेलेले धरण यंदा ६ मेपूर्वीच उणे पातळीमध्ये जाणार आहे. त्यामुळे ६ मे ते पाऊस सुरू होईपर्यंत जिल्ह्याला पाणीटंचाईच्या छळा सोसाव्या लागतील, अशी सद्य:स्थिती असून, तसा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
उजनी धरणात १२० टीएमसीपर्यंत पाणीसाठा होण्याची मर्यादा आहे. पण सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण उणेमध्ये गेल्यानंतर धरणात ६४ टीएमसी पाणीसाठा राहील. त्यापैकी ४० ते ४४ टीएमसीच पाणी असणार आहे. दरम्यान, २०१८-१९ मध्ये धरणातील उणे २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते.
यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तरी पण १५ जूनपर्यंत पाऊस सुरू झाल्यास मृत साठ्यातील १० ते १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागणार आहे. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून ७१० क्युसेक व कॅनॉलमधून तीन हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.
त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी संपत असून, त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे ६ मेपर्यंत धरण मायनसमध्ये जाईल, असा अंदाज धरणावरील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या धरणात जिवंतसाठा ६.८३ टीएमसी (१३ टक्के) पाणी आहे.
महिना अगोदरच धरण उणेमध्ये
गेल्या वर्षी पावसाळा साधारणतः १५ ते २० जूनपासून सुरू झाला होता. त्या वेळी धरण १२ जूनपर्यंत अधिक पातळीमध्येच होते. त्यानंतर धरणातील पाणीसाठा काही दिवस उणेमध्ये राहिला. पण यंदा ६ मेपासून धरण उणेमध्ये जाईल, अशी स्थिती आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३६ दिवसांपूर्वीच धरण उणेमध्ये जाणार असल्याने टॅंकरमुक्त जिल्ह्यात काही ठिकाणी टॅंकरची गरज भासेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.