
राजीव घावडे, डॉ. सतीश निचळ
-----------------------------
Soybean Charcoal Rot : सध्या विदर्भातील सोयाबीन पीक काही ठिकाणी फुलोरा व फुलोरा संपून शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. पीक साधारणतः ६० ते ६५ दिवसांपर्यंत आहे. चांदूरबाजार, अचलपूर, रिसोड, मोर्शी अशा काही ठिकाणी मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज/ खोडकुज/चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या वर्षीसुद्धा काही भागांमधून सोयाबीन मूळकुज, खोडकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांकडून समजत आहे. या रोगासंदर्भात सतर्क राहून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा खंड, दिवसाचे साधारण ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान यामुळे चारकोल रॉट (म्हणजेच मूळकुज) रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याजे दिसून येत आहे. काही विभागामध्ये व फुले संगम, जेएस-९३०५ या वाणावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येत आहे.
लक्षणे ः सुरुवातीला शेताच्या उताराच्या किंवा पाणी साचत असलेल्या काही पट्ट्यामध्ये झाडाची पाने जमिनीकडे झुकू लागतात, मलूल पडतात. ही पाने पिवळी पडत असली तरी गळून पडत नाही. पीक वाळण्याची प्रक्रिया सुरू होते. अशी झाडे उपटून मुळ्या तपासल्या असता मुळाची साल अलगद निघून येते. मुळे पांढरी पडणे ही प्राथमिक अवस्था आहे. परंतु पीक पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी फळे दिसत असल्यास ही शेवटची अवस्था असून, अशी झाडे दुरुस्त होण्यापलीकडे गेल्याचे समजावा. अशा झाडे काढून त्यांच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
उपाययोजना ः
रोग प्राथमिक अवस्थेत असल्यास म्हणजे सुरुवातीला काही भागांमध्ये पीक पिवळे पडलेले दिसत असेल तर पुढील उपाययोजना करावी.
१) ओलिताची सोय असल्यास प्रथम एक संरक्षित ओलीत करणे जरुरी आहे. फुलोरा व पुढील अवस्थेतील असलेल्या पिकाला या स्थितीमध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरड्या जमिनीतून मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाही.
२) ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे रोगाची लक्षणे दिसत असलेल्या पट्ट्यामध्ये आळवणी करावी. यामुळे रोगाची तीव्रता कमी होईल, तसेच प्रसार रोखला जाईल.
३) ज्यांच्याकडे संरक्षित ओलीत उपलब्ध नाही, त्यांनी पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता येण्यासाठी व अन्नद्रव्य पुरवठ्याच्या दृष्टीने पोटॅशिअम नायट्रेट (१३.०.४५) या विद्राव्य खताची साधारणपणे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करून घ्यावी.
४) या रोगाचा प्रादुर्भाव गेल्या एक दोन वर्षांपासून नियमित दिसत असल्यास, अशा ठिकाणी पुढील वर्षी सोयाबीन पीक घेणे टाळावे. फेरपालट करावा. कारण या रोगाच्या बुरशीचे बिजाणू ५ ते ७ वर्षे जमिनीत राहतात. त्यांना पोषक वातावरण, संवेदनशील वाण मिळाल्यास पीक शेंगा वाढीच्या अवस्थेत असताना रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढतो.
राजीव घावडे, ९४२०८४१४२१
(अखिल भारतीय सोयाबीन संशोधन प्रकल्प, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.