Nanded News : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील जिरायती पिकांसह, बागायती, फळपिकपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच पूरामुळे जमीन खरडून गेली आहे. याबाबत शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक नजर अंदाज अहवालात दोन लाख ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कळविले आहे. या अतिवृष्टीचा फटका देगलूर, बिलोली, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव तालुक्यांना बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने दडी मारली होती. यानंतर जुलैमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या देगलूर, बिलोली, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव तालुक्यांत सर्वाधिक झाला. या तालुक्यातील अनेक मंडलांत एकापेक्षा अधीक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली.
काही मंडलांत, तर दोनशे ते तीनशे मिलिमीटर पाऊस एका दिवसात झाला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन जमिनी खरडून गेल्या. तसेच खरिपातील जिरायती पिकांसह बागायती, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील शेतीचे सर्वे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते.
दोन लाख ६७ हजार शेतकरी बाधित
अतिवृष्टीमुळे देगलूर, बिलोली, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद या नऊ तालुक्यांतील ७५७ गावांना याचा फटका बसला. तर दोन ६७ हजार ४८९ शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.
या शेतकऱ्यांचे दोन लाख २३ हजार ६०२ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाल्याचे कळविले आहे. तर १०८८ हेक्टर बागायती, ३६८ हेक्टर फळपिके व नऊ हजार ६४७ हेक्टर जमीन खरडून गेल्याचे अहवालात नमूद केले आहे.
तालुकानिहाय नुकसानीचे क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)
देगलूर - ५८,६६१ मुखेड - ४२,९२१, बिलोली - ४३,४४१, किनवट - ३७,६२५, धर्माबाद - १७४३, माहूर - २७,५५४, हदगाव - २३,१९८, हिमायतनगर - ३९७ व उमरी - १६५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.