Kharif Crop Damage : सहा लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट

Kharif Crops Destroyed: पेरणी ८४ टक्क्यांच्या पुढे; १३ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून जास्त पाऊस
Kharif Crop Damage
Kharif Crop Damage Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Crop Damage Due to Heavy Rains : पुणे ः गेल्या आठवड्यापर्यंत पावसाअभावी राज्यातील खरिपाचे काही क्षेत्र नापेर राहण्याची भीती व्यक्त केली जात असताना, आता अतिवृष्टीने दाणादाण करण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे आतापर्यंत अंदाजे सहा लाख हेक्टरहून अधिक पिके नष्ट झाली आहेत.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार-पाच दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत असून, खरिपाची पिके व फळबागांची हानी झालेली आहे. २४ जुलैअखेर राज्यात किमान पाच लाख ९४ हजार हेक्टरवरील विविध पिके व फळबागा नष्ट झालेल्या आहेत. गेले काही दिवस राज्यात एकूण सरासरी पाऊस कमी बरसत होता.

परंतु गेल्या काही दिवसांमध्ये १३ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून जास्त वृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्याची एक जून ते २४ जुलै या दरम्यान झालेल्या पावसाची नोंद आता एकूण सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपर्यंत आली आहे.
आतापर्यंत यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळसह दिग्रस, दारव्हा, नेर, आर्णी, बाभूळगाव, महागाव, पांढरकवडा, वणी, झरी, कळंब, घाटंजी, पुसद, राळेगाव भागातील २.४१ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. नांदेडच्या देगलूर, मुखेड बिलोली, धर्माबाद, किनवट, माहूर, हदगाव, उमरी या तालुक्यांमधील १.६९ लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.

Kharif Crop Damage
Crop Damage Report : एप्रिलच्या ‘अवकाळी’मुळे सव्वा लाख हेक्टरवरील पिके नष्ट

अमरावती विभागातील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. वाशीमच्या मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, मानोरा, अमरावतीच्या भातकुली, नांदगाव, चांदूररेल्वे, तिवासा, मोर्शी तसेच, अकोला, तेल्हारा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, नांदुरा या भागांतील काही गावांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत देखील पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतेक भागात पंचनामे अद्यापही सुरू आहेत.

त्यामुळे राज्यातील पीकनुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
२४ जुलैअखेर राज्यात एकूण सरासरी पाऊस ४७४ मिलिमीटर होतो. परंतु यंदा आतापर्यंत ४७४.४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. गेल्या खरिपात याच कालावधीत पावसाची नोंद १२५ टक्क्यांच्या पुढे झालेली होती. राज्यात आतापर्यंत १४ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के, तर सात जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झालेला आहे.

राज्यातील खरिपाच्या एकूण सरासरी १४२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी आता १२० लाख हेक्टरवरील पेरण्या (८४ टक्के) झालेल्या आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरण्या १२७ लाख हेक्टरपर्यंत (९० टक्के) झालेल्या होत्या.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, मूग व उडदाचे पेरणी क्षेत्र यंदा कमी होणार असून, ते सोयाबीन, कापूस, मका व तुरीकडे वर्ग होणार आहे.

Kharif Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे सात लाख हेक्टरवरील पिके नष्ट

कोकणात आता भात व नाचणीच्या पुनर्लागवडीला वेग आलेला आहे. नाशिक विभागात ८४ टक्के पेरा झालेला आहे. आधीच्या पेरण्यांमध्ये आता पिकांची उगवण होत असून, रोप ते वाढीच्या अवस्थेत ही पिके आहेत. पुणे विभागातही मका, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी व तुरीच्या पेरण्यांना वेग आलेला आहे. मावळात भाताच्या पुनर्लागवडीची कामे जोर धरत आहेत. कोल्हापूर विभागात यंदा ज्वारी व बाजरीचा पेरा घटणार आहे.

परंतु मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. छ. संभाजीनगर विभागात ९१ टक्के, तर लातूर विभागात ९० टक्के पेरा झालेला आहे. नागपूर विभागात मात्र पेरण्या पिछाडीवर आहे. तेथे ७६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. अर्थात, भात लागवडीची कामे या विभागात उशिरापर्यंत चालतात. त्यामुळे सध्या पेरा कमी दिसत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.


खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (२५ जुलैअखेर)
पीक- सरासरी क्षेत्र- - गेल्या वर्षीचा पेरा--चालू वर्षाचा पेरा (टक्क्यांत)
धान १५०८३७४----८०१२३२------८३५७५१(५५)
ज्वारी २८८६१५----१३६६८४-------९४२४० (३३)
बाजरी ६६९०८९----३७७८४५--------२२२६१२ (३३)
नाचणी ७८१४९---३३५४७----------२२२६१२ (३४)
मका ८८५६०८----७९४४७४---------७०६८५१ (८०)
तूर १२९५५१६---१०८६४५०---------१००१०५८ (७७)
मूग ३९३९५७----२५७४६७----------१४७६०५ (३७)
उडीद ३७०२५२---३१९८१३--------१८६३३१ (५०)
भुईमूग १९१५७५----१४४६४५-------१०३६६५ (५४)
तीळ १५१६२--------५३९५---------३७८८ (२५)
काऱ्हाळ १२४६०------२७०३----------३६८०(५४)
सूर्यफूल १३७८०-----१००६५----------८८६(६)
सोयाबीन ४१४९९१२--४५६१५०५------४५३७८९०(१०९)
कापूस ४२०११२८----४०९१७७८------४०१६१०६(९६)
- सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.
- कंसातील आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com