
Akola News : अकोला परिमंडलात युद्ध पातळीवर वीज वाहिन्यांवरील अनधिकृत आकडे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. मागील चार दिवसांत परिमंडळातील ३६४ जणांवर कारवाई केल्यामुळे २ हजारांपेक्षा जास्त हॉर्स पॉवरचा भार कमी झाला आहे. परिणामी अकस्मात वाढलेले रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
अवैध वीज जोडणीचा वापर वाढल्याने रोहित्रे अतिभारीत होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी रोहित्रेही जळाली आहे. अनधिकृत वीज वापरामुळे महावितरण यंत्रणेवर ताण वाढत असल्याने मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी अनधिकृत हूक टाकणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्याचे क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिले आहे.
त्या अनुषंगाने अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट, सुरेंद्र कटके आणि जीवन चव्हाण ६ सप्टेंबरपासून मोहीम सुरू केली. आतापर्यंत सर्वच विभागात मागील चार दिवसांत केलेल्या कारवाईत ३६४ अनधिकृत वीज वापराचे आकडे काढले आहेत. यामध्ये अकोला ५३, वाशीम १६७, बुलडाणा जिल्ह्यातील १४४ आकड्यांचा समावेश आहे.
कृषी वाहिनीवर ३६४ ठिकाणी हूक टाकून २ हजार ३८ हॉर्स पॉवर विजेचा अनधिकृत वापर करण्यात येत होता. यामध्ये अकोला जिल्ह्यात २६५ हॉर्स पॉवर, बुलडाणा ६१३ आणि वाशीम ११६० हॉर्स पॉवर वीज वापरली जात होती. कारवाईमुळे २ हजार ३८ हॉर्स पॉवरचा अतिरिक्त भार कमी झाल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
गावठान वाहिनीवरून वीज देणाऱ्यांवर कारवाई होणार
महावितरणला माहिती न देता मंगरूळपीर तालुक्यात ९ ठिकाणी गावठाण वीज वाहिनीवरून परस्पर कृषी वाहिनीला वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. जे शेतकऱ्यांसाठी आणि महावितरण कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. शिवाय हे कृत्य कायदेशीर गुन्हा असल्याने महावितरणकडून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.