
डॉ. भागवत कराड ः ‘एसईए’चीचौथी राष्ट्रीय परिषद
Training Center : छत्रपती संभाजीनगर : ‘‘शेतकऱ्यांची काळानुरूप कौशल्ये विकसित करण्यासाठी मराठवाडास्तरीय ‘शेतकरी प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केली. या केंद्रासाठी १५ एकर जमीन देण्याची तयारी या वेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दर्शवली.
खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील शिखर संस्था ‘द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘द ऑल इंडिया कॉटनसीड क्रशर्स असोसिएशन’ (आयकोस्का) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दोन दिवसीय चौथ्या ‘सी-आयकोस्का कॉटनसीड ऑइल कॉन्क्लेव्ह-२०२३’ च्या उद्घाटन समारंभात डॉ. कराड शुक्रवारी (ता.७) बोलत होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, केंद्रीय अन्न आणि पुरवठा विभागाच्या वरिष्ठ आर्थिक सल्लागार नंदिता मिश्रा, ‘एसईए’चे अध्यक्ष अजय झुनझुनवाला, ‘आयकोस्का’चे अध्यक्ष संदीप बाजोरिया, बी. व्ही. मेहता आदी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, ‘‘पंजाब नॅशनल बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत मराठवाडा विभागीय शेतकरी प्रशिक्षण संस्था सुरू केली जाईल.
संस्थेत शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती कशी करायची याबाबतची कौशल्य शिकवले जातील. येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था असेल. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे त्यास सहकार्य मिळेल. केंद्र अद्ययावत करण्यासाठी केंद्रातर्फे निधी देऊ. मात्र, त्यासाठी १५ एकर जागेची आवश्यकता आहे. ती राज्याने द्यावी.’’
झुनझुनवाला म्हणाले, ‘‘खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील उद्योजक हे शेतकरी व सरकारमधील दुवा आहेत. आपण खूप कमी नफ्यावर काम करतो. मात्र, या नफ्यातील १ किंवा २ टक्के संशोधन व विकासावर खर्च केले तर नफ्यात मोठी वाढ होईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञांनाचा अवलंब करण्याची गरज आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर, हवामान केंद्राची स्थापना आवश्यक आहे.’’
मराठवाड्यात उद्योग विस्ताराचे निमंत्रण
दरम्यान, श्री. सत्तार यांनी उपस्थित उद्योजकांना महाराष्ट्रात, मराठवाड्यात उद्योगाचा विस्तार करण्याचे निमंत्रण दिले. ‘‘सिल्लोडमध्ये ७०० एकरावर एमआयडीसी आणि एमएडीसी उभी राहत आहे.
सिल्लोड हा कापूस आणि मक्याचा हब आहे. जालना-जळगाव रेल्वे सुरू केल्याने इथला माल आता बाहेर जाऊ शकेल. जालन्याजवळच ड्रायपोर्ट असल्याने येथे मोठी संधी आहे,’’ असे सत्तार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.