Sugarcane FRP : ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रोखले

तिसऱ्यादिवशीही ऊसदरासाठी संघर्ष समिती आक्रमक; ऊसतोड थांबली, प्रशासनाचे दुर्लक्ष
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामासाठी साखर कारखानदारांनी पहिली उचल २५०० रुपये जाहीर करावी, या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात ऊसदर संघर्ष समिती (Usdar Sangharsh Samite Solapur) आक्रमक झाली असून पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे दोन दिवसांपूर्वी रात्री आंदोलनाची ठिणगी पडली आणि पांडुरंग कारखान्याकडे (Pandurang Sugar Mill) जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे टायर फोडले. त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) तिसऱ्यादिवशी पुन्हा पंढरपूरसह मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातही आंदोलनाचा हा वणवा पेटत राहिला. या आंदोलनामुळे (Sugar Farmer Protest) सुमारे शंभराहून अधिक ट्रॅक्टर रस्त्यावरच रोखले गेले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरचालक आणि कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी, बळीराजा, रयतक्रांती, जनशक्ती, प्रहार यासारख्या सर्व शेतकरी संघटनांनी ऊसदरावर एकत्र येत ऊसदर संघर्ष समिती स्थापली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ऊसदरावर ऊसपरिषद घेऊन त्यात पहिली उचल २५०० रुपये आणि आणि अंतिम हप्ता ३१०० रुपये देण्याची मागणी समितीने केली आहे. दिवाळी सणामुळे आधी दोन दिवस गांधीगिरी मार्गाने साखर कारखान्यांना आणि ट्रॅक्टरचालक-मालकांचा सत्कार करून हा दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड थांबवण्याचे आवाहन केले.

Sugarcane FRP
Sugar Mill : पावसाची विश्रांती साखर कारखान्यांच्या पथ्यावर

पण दोन दिवसानंतरही कारखानदार गप्पच राहिल्याने बुधवारी (ता. २६) रात्री कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी वाखरीनजीक श्रीपूरच्या पांडुरंग साखर कारखान्याकडे जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे टायर फोडून आंदोलनाची ठिणगी पाडली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यादिवशी गुरुवारी सकाळी सोनके परिसरात उसाने भरलेली सुमारे ५० ट्रॅक्टर आंदोलकांनी रोखत मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) सकाळी पंढरपुरातील लिंकरोड, मंगळवेढ्यातील माचणूरनजीक आणि माळशिरसमधील निमगावनजीक ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी रोखून धरले. या परिसरात सुमारे शंभराहून अधिक ट्रॅक्टर आजही रस्त्यावर आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसते आहे, पण पोलिसांची मात्र धावपळ सुरू आहे.

Sugarcane FRP
Sugar Mill : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साखर कारखाना कटिबद्ध

महिला कार्यकर्त्याच्या दिशेने ट्रॅक्टर

या सर्व प्रकारामुळे रस्त्यावर ट्रॅक्टरचालक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद घडत आहेत. पंढरपुरात शुक्रवारी सकाळी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या विश्रांती भुसनर लिंकरोडनजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखत असताना, त्यांच्या दिशेने एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ याठिकाणी तणाव निर्माण झाला. या सगळ्या प्रकारामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

५० टक्के ऊस तोडणी थांबली

आधीच पावसामुळे हंगाम सुरू व्हायला उशीर झाला आहे. त्यात आता या आंदोलनामुळे जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांतील ऊस तोडणीचे पन्नास टक्के काम बंद झाल्याने कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. आंदोलनासंदर्भात प्रशासन वा कारखानदार अद्याप कोणतीच भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांतून मात्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे केवळ आश्वासन

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भात ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, माऊली हळणवर, सचिन पाटील, तानाजी बागल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर आणि पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची गुरुवारी (ता. २७) भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तेव्हा ऊसदर संघर्ष समिती आणि साखर कारखानदार यांची लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. पण कधी, ते काही सांगितले नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com