Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Sharad Pawar : ...अरे पुन्हा पेटवा मशाली

Sharad Pawar Latest Update : जे गेले त्यांची चिंता करू नका, जेथे गेले तेथे सुखाने राहू द्या, आपण नवीन नेतृत्वाची पिढी तयार करू. पक्ष आणि चिन्ह कुठेही जाणार नाही, ते आपल्याकडेच असेल, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

NCP Political Crisis : ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या सुरेश भटांच्या काव्यपंक्ती उद्‍धृत करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जे गेले त्यांची चिंता करू नका, जेथे गेले तेथे सुखाने राहू द्या, आपण नवीन नेतृत्वाची पिढी तयार करू. पक्ष आणि चिन्ह कुठेही जाणार नाही, ते आपल्याकडेच असेल, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

तुमचे नाणे चालत नाही म्हणून माझा फोटो
अजित पवार यांच्या बैठकीतील फलकावर फोटो लावल्याबद्दल शरद पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, की आज काही लोक मी त्यांचा गुरू आहे असे सांगत आहेत.

माझा फोटो लावत आहेत. त्यांना चांगले माहीत आहे, की आपले नाणे चालणार नाही. यांचे नाणे काही वाजणार नाही. त्यामुळेच माझा फोटो लावावा लागत आहे.

राज्यभरातील लोक उन्हातान्हातून, दगडधोंड्यांतून चालत पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. पण कधी कधी त्यांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे ते बाहेरून नमस्कार करून जातात, ते नाराज होत नाहीत.

त्यामुळे तुम्ही पांडुरंग, गुरू म्हणायचे आणि दर्शन देत नाही म्हणायचे, हे बरोबर नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांना बडव्यांनी घेरले असल्याच्या भुजबळ यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला.

Sharad Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar : “आपलं नाणं खोटं आहे हे त्यांना माहितीय म्हणूनच …”, शरद पवारांनी घेतला समाचार

भाजप तुम्हालाही संपवेल
भाजपने ज्या पक्षांशी युती केली त्यांना संपवले, असे सांगत जे इतर पक्षांबाबत झाले ते तुमच्याही बाबत होईल, असा इशारा अजित पवार गटाला शरद पवार यांनी दिला. पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार अशा बिगर भाजप राज्यात भाजपने प्रादेशिक पक्षांशी युती केली.

मात्र त्यांनी नंतर पक्ष मोडले. आज जो तुम्ही निर्णय घेतला आहे तो पक्षात बसून चर्चा करून घ्यायला हवा होता. एक लक्षात घ्या, की इतर राज्यांत लहान पक्षांसोबत जे घडलं ते तुमच्याही बाबत घडू शकते.

भाजपचे हिंदुत्व विषारी
शिवसेनेचे हिंदुत्व अठरा पगड जातींचं आहे, असे सांगत भाजपवर कडवट शब्दांत पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, की भाजपचे हिंदुत्व विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. नांदेड, अकोला आणि कोल्हापुरातील दंगलींमागे कोण होते हे जगाने पाहिले आहे.

जेथे सत्ता नाही तेथे दंगली घडवून राजकीय फायदा घ्यायची भूमिका घेतली जात आहे. ज्या राजवटीत महिला, मुली सुरक्षित नाही ती राजवट काय कामाची, असा सवालही त्यांनी केला.

त्यांना सुखाने राहू द्या
आमदारांच्या फुटीवर ते म्हणाले, की किती आमदार आले आणि किती गेले याच्या खोलात मी जात नाही. १९८० मध्ये मी परदेशात गेल्यानंतर सगळे आमदार मला सोडून गेले. केवळ सहा आमदार माझ्यासोबत होते. मात्र मी महाराष्ट्र पिंजून काढला नंतरच्या निवडणुकीत ते सगळे पराभूत झाले. त्यामुळे जे गेले त्यांना जाऊ द्या, त्यांना तेथे सुखाने राहू द्या. नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आणि सामूहिक शक्तीतून नवी राजकीय पिढी तयार करू.

Sharad Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : भाजपचं हिंदुत्व विखारी आणि समाजात फुट पाडणारं; भाजपसोबत जाऊ शकत नाही... शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

दुसऱ्याची कबर खोदता खोदता...
भाजप दुसऱ्याची कबर खोदता खोदता आपली कबर खोदत आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पक्षाची चोरी करणाऱ्यांचा देशात थयथयाट चालला आहे. एका पक्षाची चोरी केली. मात्र राष्ट्रवादीबद्दल कराल तर ते शक्य होणार नाही. कितीही झाले तरी शरद पवार या योद्ध्याचा भारतात दरारा आहे. वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कष्टामुळे झाल्या आहेत एवढी तरी जाणीव ठेवा, अशी टीका नाव न घेता त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.

सावित्रीबाईंची टिंगल करणाऱ्यांच्या शेजारी बसला
छगन भुजबळ यांचा शरद पवार आणि जयंत पाटील यांनी भाषणात समाचार घेत चांगलीच टीका केली. विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असे भुजबळ सांगत आहेत. पण दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुण्यात आल्यानंतर पवार यांनी त्यांचे स्वागत करून फुले पगडी घातली.

मात्र तुम्ही डोक्यातून महात्मा फुलेंचा विचार काढून टाकला. सावित्रीबाईंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे यांच्यासोबत पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये तुमचे नाव होते. तेव्हा शपथ घेताना बडवे आडवे आले नाहीत का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

Sharad Pawar
Sharad Pawar vs Ajit pawar : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार ; निवडणूक आयोगाकडे याचिका

‘त्यांचे’ दोन दोन संसार
एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली. ते म्हणाले, की आतापर्यंत भाजप राष्ट्रवादीवर टीका करत होते. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे सांगत होते.

पण पुढे त्यांनी लग्न केलं, मुलंबाळं झाली. आता तर दोन दोन संसार करत आहेत, त्यामुळे आनंदीआनंद आहे. निवडणुका आल्यावर एकही खोकेवाला आणि धोकेवाला निवडून येणार नाही, याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.


बापाचा नाद करायचा नाही : सुप्रिया सुळे
शरद पवार यांचे वय झाले असे काही जण म्हणत आहेत, पण रतन टाटा, सायरस पुनावाला, अमिताभ बच्चन, फारुक अब्दुल्ला यांचे वय जास्त आहे. ते जर आजही काम करतात, तर मग शरद पवार यांनी का करू नये.

माझ्या आई-बापावर कुणी बोलायचे नाही. आमच्या बापाचा नाद करायचा नाही. संघर्षाची वेळ येते तेव्हा घरातील बाई पदर खोचून उभी होते. तेव्हा ती जिजाऊ होते, ताराराणी होते, अहिल्याबाई होते.

त्यामुळे तुमचे तुम्हाला लखलाभ. मोदी यांचा नामोल्लेख न करता ‘न खाउंगा न खाने दूंगा,’ असं कुणीतरी म्हणायचे; आता येथून पुढे महाराष्ट्रात तुम्हाला दाखवतेच, असा इशारा त्यांनी दिला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हाउस फुल्ल
शरद पवार यांनी बोलविलेल्या या बैठकीला राज्यभारातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मुख्य सभागृहासह चौथ्या मजल्यावरील सभागृह, तळमजला आणि बाहेरील रिकाम्या जागेतही लोक दाटीवाटीने उभे होते. व्यासपीठावरही उभे राहायला जागा नव्हती. गर्दीमुळे काही जणांना चक्कर आली. अनेक कार्यकर्ते आत घुसण्यासाठी रेटारेटी करत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com