सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या (Ujani Dam) वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांतून अतिरिक्त पाण्याचा (Excess Water) विसर्ग अखंडपणे सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. गतवर्षी ३१ जुलैला धरणाची पाणीपातळी ५० टक्क्यांवर पोहोचली होती. यंदा मात्र बारा दिवस आधीच धरणाने टक्केवारीची अर्धशतकी पातळी गाठली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस (Heavy Rain) झाला. त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूकडील खडकवासलासह अन्य सर्व धरणांत मुबलक साठा झाल्याने हे पाणी पुढे उजनी धरणाकडे (Ujani Dam) सोडण्यास सुरुवात झाली. सुमारे ५० हजार क्युसेकपर्यंतचा विसर्ग उजनीत सोडण्यात येत होता. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने त्यात घट झाली असली, तरी विसर्ग अखंडपणे असल्याने धरणाची पाणी पातळी (Ujani Dam Water Level) झपाट्याने वाढत राहिली. विशेष म्हणजे उजनी धरणाची पाणीपातळी जूनच्या शेवटच्या आठवड्यात उणेमध्ये होती. पण ती गेल्या आठवड्यात अधिकमध्ये आली. परिणामी, उजनी धरणातील पाणीसाठा वाढत राहिला.
मंगळवारी (ता. १८) धरणातून २० हजार ९६० क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. तर सकाळी सातच्या सुमारास धरणातील एकूण पाणीपातळी ४९४.२६० मीटरवर पोहोचली होती. त्यात एकूण पाणीसाठा ८९.९२ टीएमसी, तर उपयुक्त साठा २६.२६ टीएमसी राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ४९.२ टक्के इतकी राहिली.
यंदा धरण लवकर भरण्याची शक्यता
गतवर्षी पेक्षा उजनी धरण यंदा १२ दिवस आधीच पन्नास टक्के भरले आहे. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी पाणीपातळी पन्नास टक्के झाली होती. गेल्या वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता. पण पाण्याच्या सध्याच्या विसर्गाची परिस्थिती आणि येणाऱ्या काळातील पावसाचे दिवस पाहता ते यंदा लवकर भरेल, अशी शक्यता आहे.
पाण्याचा प्रश्न तूर्त मिटला
उजनी धरण कधी शंभर टक्के भरते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात, धरणावर सोलापूरसह नगर आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे १२५ अधिक नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्याशिवाय शेतीच्या पाण्याचाही विषय आहे. त्यामुळे उजनीतील पाणी हा चर्चेचा विषय असतो, पण धरणात सध्या ५० टक्के साठा झाल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे.
पाणलोट क्षेत्रात २६७ मिलिमीटर पाऊस
गतवर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी दीड महिन्यात २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत दोन वर्षांपूर्वी १ हजार १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सर्वसाधारणपणे ५०० ते ६०० मिलिमीटर पाऊस उजनी पाणलोट क्षेत्रात पडतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.