
पुणे : नोव्हेंबर महिन्यात देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची (Low Temperature) शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने (Meteorological Department) जाहीर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची, तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आहेत.
नोव्हेंबर महिन्यातील पाऊस आणि कमाल, किमान तापमानाचा अंदाज वर्तविण्यासाठी मंगळवारी (ता. १) आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली.
मॉन्सून परतीच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातला. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेताच, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राज्यात किमान तापमानात घट झाली. परिणामी, राज्यात थंडीची चाहूल लागली. तर स्वच्छ व निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर आल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढल्याचेही दिसून आले.
यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर देशाचा वायव्य भाग आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील महिनाभरात देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. ईशान्य भारत, पूर्व भारतातील राज्य आणि अति उत्तरेकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. १९७१ ते २०२० या काळातील दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात ११८.७ मिलिमीटर, तर संपूर्ण देशात सरासरी २९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. महिन्याभरात देशात १२३ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात दक्षिण भारताचा काही भाग, देशाचा अति उत्तरेकडील भाग आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात यंदा ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जास्त जाणवणार नाही. यातच काही बंगालच्या उपसागरात प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याचे संकेत आहेत. परिणामी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.