Cow Milk Rate : गाईच्या दुधाच्या दरात पडझड सुरूच

Dairy Industry : राज्यात दुधाच्या दरात सातत्याने पडझड सुरूच आहे. ‘८.६ एसएनएफ व ३.५ फॅट’ असलेल्या गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे सरकारचे आदेश आहेत.
Cow Milk Rate
Cow Milk Rate Agrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यात दुधाच्या दरात सातत्याने पडझड सुरूच आहे. ‘८.६ एसएनएफ व ३.५ फॅट’ असलेल्या गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार दूध संघांनी काही दिवस ३४ रुपये दर दिला, मात्र खरेदी दर परवडत नसल्याचे सांगत बहुतांश दूध संघांनी दहा-बारा दिवसांपासून ‘८.६ एसएनएफ व ३.५ फॅट’ असलेल्या दुधाचे दर ३२ रुपये केले आहेत.

विशेष म्हणजे बहुतांश दूध संघांनी दराबाबत लेखीऐवजी तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात गाईच्या दुधाचे प्रतिलिटर २९ ते ३० रुपयेच मिळत आहेत. मात्र दर ३२ रुपये करताना रिर्टनचे दर ‘एसएनएफ’ला १ रुपयावरून ५० पैसे व फॅटला पन्नास पैशांवरून २० पैसे केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Cow Milk Rate
Milk Rate : रिव्हर्स रेट वाढवून दूध खरेदीदर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे का?

राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघांद्वारे दोन ते सव्वादोन कोटी लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते. ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला चार महिन्यांपूर्वी ३८-३९ रुपयांपर्यंत प्रतिलिटर दर मिळत होता.

मात्र पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत खासगी दूध संघचालकांनी दुधाचे दर कमी करत ते ३२ रुपयांवर आणले होते. त्यानंतर दूधदराबाबत नेमलेल्या समितीने गाईच्या दुधाला ३४ रुपये दर देण्याची शिफारस केली.

त्यानुसार दूध संघांनी २१ जुलै २०२३ पासून ३४ रुपये दर द्यायला सुरुवात केली. त्याच वेळी जाहीर दरापेक्षा कमी ‘फॅट व एसएनएफ’ असलेल्या प्रत्येक पॉइंटला होणाऱ्या ‘रिटर्न दरा’तही वाढ करत ‘एसएनएफ’च्या पॉइंटला ३० पैशांऐवजी एक रुपया व फॅटच्या प्रत्येक पॉइंटला २० ते २५ पैशांऐवजी ५० पैसे कमी केले जात आहेत. त्यामुळे गाईच्या दुधाला सध्या तरी प्रतिलिटरला ३० रुपयांच्या आतच दर मिळत होता.

आता पुन्हा दूधदरात घट केली आहे. त्यामुळे समिती नियुक्त करूनही दुधाच्या दरात राज्यात पडझड सुरू आहे. एकतर दुष्काळजन्य स्थिती असल्याने चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे, त्यातच दर पाडले जात असल्याने दूध उत्पादक त्रस्त आहेत.

Cow Milk Rate
Milk Rate : दुधाच्या मापात पाप करणाऱ्यांवर बसणार चाप, छगन भुजबळांच्या उपस्थितीत लवकरच बैठक

पशुखाद्य दरावर नियंत्रण नाहीच

दुधाचे दर ३० रुपयांवर गेले होते, त्या वेळी पशुखाद्याचे दर वाढलेले होते. सोयाबीन, मका, सरकी यांच्या दरावर पशुखाद्याचे दर ठरतात. दुधाचे दर ३८ वरून ३२ रुपयांवर आल्यानंतर शेतकऱ्यांत संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे दूध दराबाबत राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली.

समितीने दूध दरासोबतच पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्याची शिफारस केली होती. बहुतांश दूध संघच पशुखाद्यही तयार करतात. शिफारस केल्यावरही पशुखाद्याचे दर कमी झालेले नाहीत. उलट गेल्या पंधरा दिवसांत पशुखाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत.

पाऊस नाही, चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची अवस्था वाईट आहे. सरकारने आदेश देऊही दहा-बारा दिवसांपासून दुधाला ३४ ऐवजी ३२ रुपये दर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात लिटरला २९ ते ३० रुपयेच पडत आहेत. पशुखाद्याचे दर अनियंत्रित आहेत. दूध भेसळही थांबत नाही. त्यामुळे दूध व्यवसाय सांभाळणे जिकिरीचे झाले आहे.
- सर्जेदार खेमनर, दूध उत्पादक, वडनेर, ता. राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com