

राजकुमार चौगुलेः ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर (Sugar Rate) वाढत असताना देशांतर्गत बाजारात मात्र दरवाढ फारशी नाही. चार वर्षांपूर्वी साखरेचे किमान विक्री मूल्य (मिनिमम सेलिंग प्राईस) क्विंटलला ३१०० रुपये इतके ठरविले आहे.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात ५२०० ते ५५०० रुपये क्विंटलपर्यंत साखरेची विक्री होत आहे. भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर दराचा कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे भारतीय साखर कारखानदार अस्वस्थ आहेत.
निर्यातीला परवानगी द्यायची नसेल तर साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढवावे, अशी मागणी साखर उद्योगातून (Sugar Industry) करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसाचा कालावधी वगळता वर्षभरात स्थानिक बाजारात साखरेला फारशी समाधानकारक मागणी नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत, असे असतानाही भारतीय साखर उद्योगाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.
निर्यातीला परवानगी नसल्याने साखर आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवू शकत नाही, अशी स्थिती भारतीय साखर उद्योगाची आहे.
तीन वर्षांपूर्वी काढलेली कर्जे साखर कारखानदार अजून भरत आहेत. देशाबाहेर दर चांगले आणि विक्री करायला संधी असताना केवळ सरकारी धोरणामुळेच साखर उद्योग अडचणीत आल्याची टीका साखर कारखाना प्रतिनिधींनी केली आहे.
धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अधिकारीच खोडा घालत असल्याचा आरोपही कारखानदारांचा आहे.
‘‘केंद्राने पुन्हा एकदा सद्यःस्थिती जाणून घेऊ साखर कारखानदारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. साखरेला चांगला दर मिळाल्यास ऊस उत्पादकालाही तातडीने एफआरपी देता येईल’’, असेही एका कारखाना प्रतिनिधीने सांगितले.
राज्य व देश पातळीवरील साखर कारखानदारांच्या संघटनेने ‘एमएसपी’वाढीबाबत सातत्याने प्रयत्न केले आहेत. पण या मागणीकडे केंद्र दुर्लक्ष करत असल्याची टीका साखर उद्योगातून होत आहे.
आंतरराष्ट्रीय दर उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर गेल्या दहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. बुधवारी (ता.१२) रिफाईन व्हाइट शुगरचे दर लंडन साखर बाजारात ७०२ डॉलर प्रतिटन (५५००० रुपये प्रतिटन) इतके होते.
तर कच्च्या साखरेचे दर अमेरिकन बाजारात २४.३७ पौंड प्रति सेंट (५० हजार रुपये प्रतिटन) वर पोहोचले आहेत.
भारतीय साखर स्थानिक बाजारातच खपणार
येणाऱ्या काही महिन्यात केवळ ब्राझीलमधून साखर जास्तीत जास्त येऊ शकते. यामुळे दर वाढलेले राहतील, असा अंदाज आहे. भारत
सरकार देशांतर्गत गरज भागविण्याला प्राधान्य देत आहे. यामुळे भारतीय साखरेचा खप स्थानिक बाजारातच होण्याची शक्यता आहे.
सरकारची नाही निर्यातीची मानसिकता
ब्राझीलमधून अजूनही सुरू नसलेले साखर उत्पादन आणि अंतिम टप्प्यात आलेला साखर हंगाम, घटत्या साखर उत्पादनामुळे भारत सरकार अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी देण्याच्या मानसिकतेत नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज दर वाढ होत आहे. ऑक्टोबरमध्ये रिफाईन व्हाइट शुगरचे दर लंडन साखर बाजारात ५०९ डॉलर प्रतिटन तर कच्च्या साखरेचे दर अमेरिकन बाजारात १७ पौंड प्रतिसेंटच्या दरम्यान होते. त्यानंतर मात्र दराने उसळी घेतल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.