संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी प्रकर्षाने पुढे येत असतानाच नैसर्गिक आपत्तीने मराठवाड्यातील खरिपात पेरणी (Kharif Sowing) झालेल्या एकूण क्षेत्रापैकी आजवर ६३ टक्के क्षेत्र बाधित झाल्याची बाब पुढे आली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत १२ लाख ४९ हजार हेक्टरला दणका बसला होता. त्यात आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार नुकसान क्षेत्रात १७ लाख ७० हजार ७४८ हेक्टर पीक नुकसानीची भर पडली आहे. त्यामुळे एकूण नुकसान क्षेत्र ३० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.
मन सुन्न करणारी ही शेतीपिकाच्या नुकसानीची ही आकडेवारी पुण्यात दुष्काळाचीच साक्ष देणारी दिसते आहे. यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४८ लाख २२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ऑगस्ट अखेरपर्यंत अतिवृष्टीने ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टर, सततच्या पावसाने ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर, तर गोगलगायीने नुकसान केलेल्या ७२ हजार ४९१ हेक्टर मिळून १२ लाख ४९ हजार ७३१ हेक्टर क्षेत्राला आधीच ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा सामना करावा लागला होता. आता प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेल्या १७ लाख ७० हजार ७४८ हेक्टर क्षेत्राची त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे क्षेत्र पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राच्या ६३ टक्क्यांपर्यंत म्हणजे ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवर पोहोचले आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी बाधित क्षेत्र २५ टक्क्यांच्या पुढे गेले होते. त्यामध्ये आता सप्टेंबर-ऑक्टोबरमधील नुकसान झालेल्या शेती पिकाच्या आकड्यांमुळे मोठी भर पडली आहे. याआधी शासनाने नुकसान भरपाईपोटी जवळपास १७०० कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमधील प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी २४७९ कोटी ३२ लाख रुपयाचा निधी लागणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. नुकसानीची ही स्थिती शेतकऱ्यांच्या ओल्या दुष्काळाच्या मागणीला रास्त ठरवणारी अशीच आहे. अर्थात शासन याविषयी काय निर्णय घेते याकडे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय पेरणी व बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा...पेरणी...बाधित क्षेत्र
औरंगाबाद... ६७१४२६...४५६६२२
जालना... ६२५२१०.... ३९१९८२
परभणी... ५२१६१८... २२२८२९
हिंगोली... ३५०६१८... २२२६५७
नांदेड... ७५७०८६.... ५४८९९१
बीड.... ७५७०३४.... ४८२१९९
लातूर.... ५८६२०२... ३२४८०३
उस्मानाबाद... ५५३४९६...३९११९६
प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरमधील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा.... बाधित क्षेत्र
औरंगाबाद... ४४३९४३
जालना... ३८८९९२
परभणी... २१९१०५
हिंगोली... १२३६०
नांदेड... २१५००
बीड.... ४७८३२७
लातूर.... १४९४२
उस्मानाबाद... १९१५७९
सप्टेंबर-ऑक्टोबरमधील नुकसानभरपाईसाठी अपेक्षित निधी (रुपयांत)
औरंगाबाद ६२८ कोटी १०लाख
जालना ५७५ कोटी ४७ लाख
परभणी... २९७ कोटी ९८ लाख
हिंगोली.... १६ कोटी ८१ लाख
नांदेड.... २९ कोटी २४ लाख
बीड... ६५० कोटी ५३ लाख
लातूर... २० कोटी ४४ लाख
उस्मानाबाद... २६० कोटी ७६ लाख
एकूण.... २४७९ कोटी ३२ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.