
Latest Agriculture News : दहिगाव उपसा सिंचन योजना बंद असताना पाऊस लांबणीवर पडल्यामुळे व विहिरी आणि बोअरची पाणी पातळी खालावल्याचा फटका करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील दहा हजार एकर क्षेत्राला बसणार आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, केळी निर्यातीवर याचा परिणाम होणार आहे.
गेल्या चार- पाच वर्षांपासून करमाळा तालुक्यातील केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील वरकटणे, सरपडोह, सौंदे, साडे, कोंढेज, गुळसरी, शेलगाव, साडे, निंभोरे, देवळाली, कुंभेज या गावच्या परिसरात केळी पिकाखालील क्षेत्र वाढले होते.
या परिसरातील काळ्याभोर जमिनीला पाणी उपलब्ध झाल्याने दर्जेदार केळीचे उत्पादन या परिसरात होत होते. निर्यातक्षम केळी उत्पादनाचे आगार म्हणून या भागाची ओळख होऊ लागली होती. मात्र, यावर्षी मे महिन्यात लवकरच दहिगाव योजना बंद झाली.
या गावाच्या परिसरातील विहिरी व बोअरची पाणी पातळी खालावल्याने केळी पिकासाठी पाणी मिळणे मुश्कील झाले. काही शेतकरी पिके वाचविण्यासाठी टॅंकरने पाणी सोडत आहेत. परंतु त्याला मर्यादा असल्याने लाखो रुपये खर्च करून उभी केलेली केळीची पिके पाणी कमी पडल्यामुळे जळू लागली आहेत.
जुलैअखेर समाधानकारक पाऊस झाला नाही तर तालुक्याच्या पूर्व भागातील दहा हजार एकर क्षेत्रातील केळीचे पीक धोक्यात येणार असून, शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
शेलगाव परिसरातील या शेतकरी टॅंकरने विहिरीत पाणी सोडून ही पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यासाठी होणारा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांनी धीर सोडला आहे. जुलै महिना निम्मा संपला तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही सर्व पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.