
Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात आंतरमशागतीला वेग आला आहे. पीक जोमात आहे. परंतु पिकात तण मात्र वाढले आहे. मजूरटंचाई देखील असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.
खानदेशात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित होती. परंतु लागवड कमी झाली आहे. कृषी विभागाचे अहवाल तयार करण्याचे काम सुरूच आहे. परंतु कोरडवाहू कापूस लागवड पाऊस उशिरा आल्याने कमी झाल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.
खानदेशात पूर्वहंगामी कापसाची सुमारे दीड लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. अनेकांनी काळ्या बाजारातून बियाणे खरेदी करून मेच्या मध्यानंतर लागवड सुरू केली. तर काहींनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कापूस लागवड केली.
कमाल शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन यंत्रणांचा आधार घेऊन लागवड केली आहे. अनेकांचे पूर्वहंगामी कापूस पीक दीड महिन्याचे झाले आहे. त्याची वाढ जोमात आहे. अतिपाऊस नसल्याने अपवाद वगळता मर रोगाची समस्या पिकात नाही. ६ जुलैपासून खानदेशात पाऊस झाला आहे. पावसात सातत्य आहे. यामुळे सिंचन बंद करण्यात आले. पिकात दोनदा आंतरमशागत झाली असून, खते देण्याचे कामही सुरू आहे.
तसेच अनेकांच्या क्षेत्रात तण वाढले. यामुळे तण नियंत्रणाचे काम सुरू झाले आहे. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे तण नियंत्रणाचे काम सुरू झाल्याने मजूरटंचाई सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण मजुरांची इतर गावांमधून ने-आण करावी लागत आहे. त्यासाठी वाहनभाडेही शेतकऱ्याला द्यावे लागत आहे.
तण नियंत्रणाचा एकरी खर्च यामुळे १५ ते २० टक्के वाढला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. यात काही शेतकरी तणनाशकांची फवारणी करून घेत आहेत. यासाठी एकरी १२०० ते १३०० रुपये खर्च येत आहे. कापूस पिकासाठी स्वतंत्र तणनाशके बाजारात असल्याने त्याची उचल शेतकरी करीत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी फवारणीतून खते, अन्नद्रव्ये पिकाला दिली आहेत. तर काही शेतकरी जमिनीतून सरळ खते किंवा संयुक्त खते देत आहेत. धुळे व जळगावात १०.२६.२६ या खताची काहीशी कृत्रीम टंचाईदेखील आहे. हवी तेवढी खते शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. कीडनाशकांची फवारणी मात्र शेतकऱ्यांनी केलेली नाही. कारण पिकावर रोगराई सध्या नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.