Soybean Sowing : खानदेशात सोयाबीन पेरणी स्थिर

Kharif Season 2023 : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर असून, पेरणी सुमारे ३८ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २८ हजार हेक्टरवर झाली आहे.
Soybean Sowing
Soybean Sowing Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर असून, पेरणी सुमारे ३८ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २८ हजार हेक्टरवर झाली आहे. पेरणीची अंतिम माहिती अद्याप जारी झालेली नाही. परंतु लवकरच अंतिम अहवाल जारी होईल, अशी माहिती आहे.

यंदा अनेकांनी कापसाची लागवड कमी करून सोयाबीनला पसंती दिली. सोयाबीनचे जळगाव जिल्ह्यातील अपेक्षित क्षेत्र सुमारे २८ हजार हेक्टर एवढे आहे. एवढी पेरणी जिल्ह्यात झाली आहे. कारण ६ जुलैनंतर अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीला वेग आला. पेरणीनंतरही पाऊस बरा होता. यामुळे उगवणही चांगली झाली आहे.

Soybean Sowing
Soybean Sowing : बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही

सद्यःस्थितीत पीक चांगले असून, त्यात आंतरमशागतही एक वेळेस झाली आहे. तसेच खतेही एकदा देण्यात आली आहेत. वाफसा लक्षात घेऊन अनेक जण फवारणीदेखील करून घेत आहेत. पिकात वाफसा अनेक दिवस नसल्याने तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकांचा उपयोग केला.

सोयाबीनच्या काही तणनाशकांचा तुटवडादेखील आहे. कारण मागणी सतत आहे. कमी दरातील प्रभावी तणनाशके नसल्याने नाईलाजाने महागडी तणनाशके शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहेत. यामुळे उत्पादन खर्च काहीसा वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या अनेकांच्या पिकात फुले लगडत आहेत. काही शेतकऱ्यांनी लवकर उत्पादन देणाऱ्या किंवा कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वाणांची लागवड केली आहे. अनेकांनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले आहे.

Soybean Sowing
Maharashtra Soybean Sowing : राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबीनच्या पेरण्या तर कापसाचीही बाजी, पावसाची टक्केवारीही आली समोर

धुळे व नंदुरबारातही सोयाबीनची पेरणी कमी आहे. परंतु या दोन्ही जिल्ह्यांत काही भागातच पेरणी केली जाते. धुळ्यात शिरपूर व काही प्रमाणात शिंदखेडा तालुक्यात सोयाबीनचे पीक असते. नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर भागात काही शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात.

यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील क्षेत्र १० हजार हेक्टरपेक्षा अधिक राहत नाही. जळगाव जिल्ह्यात मागील दोन हंगाम बऱ्यापैकी सोयाबीन पेरणी झाली असून, मागील हंगामात अनेकांना एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन आल्याने पीक परवडले.

यंदाही चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, अमळनेर, पाचोरा, जामनेर आदी भागात सोयाबीनचे पीक आहे. तापीकाठी अधिकचे क्षेत्र असून, काळ्या कसदार क्षेत्रात पीक जोमात आहे. अनेक जण सोयाबीनचे पीक घेवून पुढे त्यात हरभऱ्याची पेरणी करतात. जमीन सुपीकता व चांगले उत्पादन यामुळेदेखील सोयाबीनकडे वळल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com