Pune News : जून महिना संपायला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. अद्यापही वरुणराजा बरसला नाही. यामुळे जुन्नर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह विविध व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
पेरण्यावेळेवर झाल्या नाही तर उडीद, मुगाच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जुन्नरच्या पूर्व भागातील गावांमध्ये प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन,मठ,चवळी आदी पिके घेतली जातात. पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाळा लांबल्याने आता टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली तरी पावसाने हुलकावणी दिली आहे.चालूवर्षी मे महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी कायम वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही प्रमाणात नुकसानदेखील झाले.
मॉन्सूनपूर्व वळवातील रोहिणीच्या पावसानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चंदा खरीप हंगामाच्या दृष्टीने आपापल्या शेतशिवाराची मशागत केली असली तरी पावसाचा श्रीगणेशा न झाल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात आहे. तालुक्यातील बी-बियाणे व खतांच्या दुकानांमध्ये यंदा शुकशुकाट आहे.
रोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळिराजा मात्र चांगलाच गोंधळला आहे. यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्राकडून मिळाल्यानंतर सर्वाना दमदार पावसाची अपेक्षा होती.
मात्र, मॉन्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविले जात आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत पूर्ण झाली असून, शेतकरी पावसाच्या वाटेवर डोळे लावून बसले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.