कोल्हापूर : जिल्ह्यतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) धक्कादायक निकालाची अनपेक्षित नोंद झाली. गावातील अनेक मातब्बरांचे गड धडाधड कोसळले तर अनेकांना सत्ता टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा एकूण कल सत्तांतराचाच राहिला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांचीच सरशी झाली. अनेक ठिकाणी सरपंच (Sarpanch) एका गटाचा तर सत्ता एका गटाची अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी अजूनही सुरू होती.
Agriculture४२९ ग्रामपंचायतींसाठी १२ ठिकाणांवर सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या तासाभरातच गावोगावचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली. निकाल जाहीर होतील तसे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गुलालाची उधळण सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणाहून संबंधित गावांकडे जल्लोषात जाणारे कार्यकर्ते असे चित्र बहुतांशी गावात राहिले.
जिल्ह्यातील अनेक मातब्बरांच्या गटालाही काही गावांमध्ये धक्कादायक पराभव पत्करावा लागला. राज्य पातळीवरील नेत्यांच्या गावांनी आपापले गड सुरक्षित ठेवले तर काही ठिकाणी थोडक्यात सत्ता गेल्याचे चित्र होते. काही गावांमध्ये सरपंच एका पक्षाचा तर सत्ता एका पक्षाची अशी विचित्र परिस्थिती झाल्याने आनंद साजरा करावा की नको या द्विधा परिस्थितीत कार्यकर्ते होते.
कागलमध्ये बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत समरजित सिह घाटगे गटाने बाजी मारली. कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला या तीन ग्रामपंचायतींत धक्का बसला. पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य व शिवसेनेचे उमेदवार सत्तेकडे मार्गक्रमण करत होते. राधानगरीत विविध आघाड्या यशस्वी होताना दिसत होत्या. शिरोळ तालुक्यामध्ये १७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखल्याचे चित्र होते.
काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत १७ पैकी १० ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे. करवीरमध्ये वडणगेत धक्कादायक सत्तांतर झाले. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सतेज पाटील यांच्या काँग्रेसच्या गटाने मुसंडी मारल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी नवीन उमेदवार निवडून आले. तर काही ठिकाणी मातब्बर उमेदवारांनाही अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. संमिश्र यश मिळालेल्या गावांमध्ये एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू असेच चित्र राहिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.