
Pune News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल ठेवा असलेली वाघनखे परत देण्यास मान्यता मिळाली आहे. मात्र जगदंबा तलवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
तलवारीच्या हस्तांतरासाठी आवश्यक असलेल्या काही तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहेत. त्यानंतर इंग्लंडमधील वाघनखे व तलवार एकत्रितपणे भारतात आणली जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे साकारलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला श्री. मुनगंटीवार यांनी शनिवारी (ता. ५) भेट दिली. पत्रकार परिषदेत श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘जगदंबा तलवार परत आणण्यासाठी १९८० च्या दशकापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आता आम्ही मात्र तलवार आणणारच. तलवार हस्तांतरात इंग्लंडकडून काहीही अट सांगितलेली नाही.
त्यात मोठी समस्यादेखील नाही. केवळ येथील घराण्याशी संबंधित काही मुद्दे आहेत. ते दूर केले जात आहेत. वाघनखे तत्काळ भारतात आणता येतील. मात्र आमचा प्रयत्न वाघनखे व तलवार एकत्रितपणे आणण्याचा आहे. ४५६ हिरेमाणिक लावलेली ही तलवार शिवरायांच्या दरबारात बाळगली जात होती.’’
छत्रपती शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. राज्याभिषेकाच्या निमित्ताने रिझर्व्ह बॅंकेने शिवकालीन होन नाण्याचे सोने, चांदीचे शिक्के पुन्हा काढावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
याबाबत मी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्यात अडचणदेखील नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांची काळजी घेतली जात आहे. याशिवाय मुंबईत ३० एकर भागांत शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितले.
सह्याद्रीत वाघ आणणार
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये जादा ठरलेले वाघ सह्याद्रीत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत का, असे विचारले असता श्री. मुनगंटीवार यांनी होकार दर्शविला. ‘‘वाघ हस्तांतरित करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून होते आहे. आम्ही त्याबाबत सर्वसंमतीची अपेक्षा करतो आहोत. वाघ स्थलांतरित केल्यानंतर पुन्हा आक्षेप घेतले जाऊ नयेत यासाठी सर्वांचा होकार आवश्यक आहे. अर्थात, स्थलांतरासाठी केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागेल,’’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.