
Mumbai News : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाचे लक्ष लागले असून येत्या आठवड्यात विस्ताराची चिन्हे आहेत. शिंदे गटातील काही मंत्र्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे असून भाजपच्या काही निष्क्रिय मंत्र्यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत.
शिंदे -फडणवीस सरकार वर्षपूर्ती करत असतानाच पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत भाजपच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यात चार तासांहून अधिक काळ बैठक झाली. या बैठकीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या तपशिलाबाबत गोपनीयता पाळण्यात आली असली तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दीर्घ चर्चा झाल्याचे समजते.
शिंदे गटातील मंत्र्यांवर गंडांतर येणार हे निश्चित असले तरी शिंदे मात्र, त्यांना हटविण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत. त्यामुळे सर्वच मंत्री निश्चिंत आहेत. फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेतली.
या बैठकीत वर्षभरातील कामगिरीवर चर्चा झाली. या सर्व मंत्र्यांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वासमोर फडणवीस यांनी मांडल्याचे सांगण्यात आले. भाजपमधील काही निष्क्रिय मंत्र्यांची गच्छंती अटळ असून त्याजागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
मुख्यमंत्री आणि सत्तार यांच्यात दुरावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले कृषिमंत्री सत्तार सावलीसारखे वावरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांमुळे सत्तार यांच्याभोवती वाद निर्माण झाले होते. सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना दोन हात लांब ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त भरविण्यात आलेल्या कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनाला सत्तार यांची अनुपस्थिती होती. ईद असल्याने ते कार्यक्रमाला आले नाही असे सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही. सत्तार हे कृषिप्रदर्शन घेण्यासाठी फार आग्रही होते. मात्र, त्यांच्या ‘मनासारखे’ आयोजन न केल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.