Jalgaon News : युती सरकारला राज्यात लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. सरकारने आतापर्यंत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, तरुण अशा सर्वांचेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात केले.
शहरात पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी (ता. २७) आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंपदामंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, माजी आमदार चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांना केंद्राच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासन सहा हजार रुपये आणखी अनुदान देणार आहे. एक रुपयात पीकविमा योजनेत सहभागी होण्याची संधी यंदा मिळणार आहे.
असंघटित कामगारांसाठी काम सुरू आहे. महिलांचा सन्मान केला जात असून, महिला बचत गटांसाठी आणखी योजना आणल्या आहेत. काही योजना विचाराधीन आहेत. एसटीत महिलांना प्रवासाची सवलत दिली आहे.
काही लोकं शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका करीत आहेत. पण या योजनेतून तलाठी, तहसीलदार, शासकीय कर्मचारी गावागावांत जाऊन दाखले वाटप करीत आहेत, जनतेची कामे करीत आहेत. अनेकांना या योजनेतून लाभ मिळाला आहे. दुर्गम भागात शासन आपल्या दारी योजनेतून चांगली मदत लोकांना होत आहे. बंद झालेल्या योजना सुरू केल्या. पूर्वीचे सरकार अहंकारात बुडाले होते.
त्यांना योजनांची माहितीच नव्हती. पण डबल इंजिनच्या सरकारने योजना पुन्हा सुरू केल्या, राज्यभरातील साडेबारा कोटी लोकांच्या आरोग्यासंबंधी पाच लाख रुपये निधीची तरतूद करण्याची योजनाही सरकार आणत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात केळी विकास महामंडळ आहे. या महामंडळासाठी १०० कोटी रुपये निधी देऊ. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबारसाठी स्वतंत्र महसूल विभागीय आयुक्त कार्यालय जळगावात स्थापन केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली.
कापूसप्रश्नी सरकार गंभीर ः फडणवीस
कापूसदरांच्या समस्येबाबत मुख्यमंत्री व मी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो आहोत. जो कापूस घरात पडून आहे, त्याला चांगला मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील हंगामासाठी केंद्राने कापसासंबंधी हमीभाव वाढवून सात हजार २० रुपये प्रतिक्विंटल असा केला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.