
Nagar News : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दोनवेळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मात्र आता सोमवारी (ता. ७) शिर्डीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी विशेष बसचे आयोजन केले असून, कोट्यवधी रुपयांच्या खर्च यासाठी प्रशासन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील महसूल यंत्रणा या कामासाठी गेल्या आठवड्याभरापासून राबत आहे.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वत्र सुरू झालेला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले जाते. ही योजना राबवताना नागरिकांना लागणाऱ्या सर्व दाखल्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. हे दाखले देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक प्रतीक्षेत आहे. नगर जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम दोन वेळेला पुढे ढकलण्यात आला होता.
त्याला वेगवेगळी कारणे होती. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गेल्या आठवड्याभरापासून जिल्हा प्रशासनाच्या समवेत नगर, शिर्डी, श्रीरामपूर यांसह विविध ठिकाणी स्वतंत्र बैठका घेत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यासाठी व याला जास्तीत जास्त लाभार्थी कशा पद्धतीने येतील याची नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार येथे प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून त्यांच्याकडून सर्व माहिती ओळखपत्र हे अगोदरच जमा करून घेतले आहे. त्या त्या भागातून लाभार्थ्यांना आणण्यासाठी स्वतंत्र अशी बसेसची व्यवस्था प्रत्येक तालुक्यातून करण्यात आली आहे.
हे लाभार्थी सकाळी या बसमध्ये बसून शिर्डीला येतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही यंत्रणा लाभार्थ्यांच्या संपर्कामध्ये असून, प्रत्येक तालुक्यातून जे बस नियोजन केले आहे त्या बसेस थेट शिर्डीपर्यंत कशा पद्धतीने येतील याचा एक आराखडा तयार केला आहे. गेल्या महिन्याभरापासून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी करतानाच या लाभार्थ्यांना कोणकोणत्या पद्धतीचे दाखले द्यायचे आहेत किंवा लाभ द्यायचा आहे याची सर्व माहिती एकत्र करण्यात आली आहे.
या लाभार्थीचा घेऊन जाण्यासाठी विशेष अधिकारीसुद्धा नियुक्त केलेले आहेत. व त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच दुसरीकडे या लाभार्थ्यांना नेण्यासाठी व त्यांना आणण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करून त्यांची भोजनाची सुद्धा व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करायचा असा निर्धार येथील प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून या कामाला लागले आहे. हा कार्यक्रम कशा पद्धतीने होतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.