NCP Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, आज शरद पवार यांनी नवीन विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेबद्दल मोठे विधान केले आहे.
विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांची एकूण संख्या ५४ आहे. बंडानंतर अजित पवार यांनी आम्हाला ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. परंतु शरद पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहे. याचे चित्र स्पष्ट झाले नसताना राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची पक्षप्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. परंतु सध्या परिस्थितीनुसार विरोधी पक्षातील काॅंग्रेसकडे सर्वाधिक आमदार ( ४४) आहेत. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर काॅंग्रेसच्या काही नेत्यांनी दावा केला आहे.
त्यात आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते पदाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता शरद पवार म्हणाले, ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त त्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेते पद जाईल. काॅंग्रेसकडे जास्त आमदार असल्याने त्यांचीच या पदावर मागणी रास्त आहे, असे वक्तव्य केले.
शरद पवार म्हणाले, मला पक्षामध्ये बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. संख्याबळ कमी जास्त होत असते. त्यामुळे पक्षात होणारी बंडखोरी माझ्यासाठी नवीन नाही. बंडानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. पक्षाचा नेता उत्साही असल्यास कार्यकर्ते दुप्पट उत्साही असतात. अशा गोष्टी घडल्यानंतर माझा सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्याहून कराडला येत असताना ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना उत्साह पाहिला. विशेषत: तरुण माझ्या पाठिशी आहेत. ज्यावेळी अन्याय आणि अत्याचार होत असतो. तेव्हा उद्रेकाची सुरुवात साताऱ्यातून होत असते. म्हणून मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी कराडमध्ये आलोय. राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी नवीन सुरु केली असल्याचे पवार यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.