
Pune News : लोकमान्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार मिळणे माझे सौभाग्य असून, माझ्या जीवनातील ही अविस्मरणीय घटना आहे. स्वातंत्र्यलढ्यात असंतोषाचे जनक बनलेल्या लोकमान्य टिळकांना महात्मा गांधींनी आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटले होते. त्यांच्या स्वप्नातील राष्ट्र आज जगातील पाचवी महासत्ता म्हणून आकाराला येते आहे,’’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ स्वीकारताना पंतप्रधान मोदी बोलत होते. पुण्यातील टिळक स्वराज संघ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टकडून दिला जाणारा हा पुरस्कार सर परशुराम महाविद्यालयात एका विशेष सोहळ्यात श्री. मोदी यांनी स्वीकारला. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, सदस्य सुशीलकमार शिंदे, रोहित टिळक, प्रणिती टिळक व दीपाली टिळक व्यासपीठावर होते.
सोहळ्यात श्री. मोदी यांना गुजराती भाषेतील भगवद्गीतेची प्रत, लोकमान्य वापरायचे तसा पंचा, पगडी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान म्हणाले, ‘‘या पुरस्कारामुळे आज मी उत्साही, भावूक आहे. छत्रपती शिवराय, जोतीबा फुले यांच्या या महाराष्ट्र भूमीला मी प्रणाम करतो. देशात काशी व पुणे ही विद्वत्तेने ओळखली जातात.
हा पुरस्कार स्वीकारताना जबाबदारीही वाढली आहे. जनतेची सेवा आणि अपेक्षापूर्तीसाठी मी अजिबात कसूर करणार नाही. लोकमान्यांच्या नावात ‘गंगा’धर आहे. त्यामुळे या पुरस्काराची रक्कम मी ‘नमामी गंगा’ प्रकल्पाला; तर हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासियांना समर्पित करतो.’’
श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात लोकमान्यांचे ऐतिहासिक दाखले दिले. ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विदेशात उच्चशिक्षण घ्यावे ही लोकमान्यांची इच्छा होती. लोकमान्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादेत ४० हजार लोकांचा समुदाय जमला होता. त्यात सरदार वल्लभभाई पटेलदेखील होते. पुढे वल्लभभाई नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी अहमदाबादेत लोकमान्यांचा पुतळा बसवला होता आणि त्याचे अनावरण महात्मा गांधींनी केले होते.’’
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. टिळक म्हणाले, ‘‘यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, इंदिरा गांधी, शंकर दयाळ शर्मा, शरद पवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यंदा निवड समितीसमोर नरेंद्र मोदी हेच एकमेव नाव आले. लोकमान्य टिळकांचे सूत्र श्री. मोदी कृतीतून सांगतात. तसाच कार्यक्रम व उपक्रम राबवतात. श्री. मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला व श्री. पवार आवर्जून या कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.’’
व्यासपीठावर व्यक्त झाला आदरभाव
लोकमान्यांच्या नावाने नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देऊ नये, तसेच या सोहळ्यासाठी शरद पवार यांनी येऊ नये म्हणून राज्यभरातून प्रयत्न झाले होते. त्यामुळे या सोहळ्याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते.
मात्र व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी आदरभाव व्यक्त केला. श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात श्री. पवार यांचा उल्लेख करताना ‘आदरणीय’ शब्द वापरला. तर श्री. पवार म्हणाले, की हा पुरस्कार यापूर्वी देशपातळीवरच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना दिला गेला आहे. त्या यादीत आता नरेंद्र मोदी आले आहेत. मी त्यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.