Solapur News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुकानांमध्ये बी-बियाणे, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. खरिपाची पिके न आल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी या जिल्ह्याची खरिपाचा जिल्हा म्हणूनदेखील ओळख आहे. जिल्ह्याच्याअनेक भागात तूर, मूग, उडीद या खरिपांच्या पिकांबरोबरच बार्शी, उत्तर सोलापूर व मोहोळमधील काही भागात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. यंदा जिल्ह्याच्या काही ठराविक भागातच पाऊस पडल्याने इतर सर्व जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप काही ठराविक क्षेत्र सोडले तर कुठेही पेरणी झालेली नाही.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने रब्बीची पेरणी जास्त होईल, मात्र, खरिपाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
अल्पशा पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्याने पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी, असे कृषी विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे. साधारणतः: ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले होते. अजूनही जिल्ह्यातील अनेक भागात इतक्या पावसाची नोंद झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबलेल्या आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला ...
हवामान बदलानुसार, सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. यामुळे या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये. पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.