Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज (ता.११) पंढरपूरकडे प्रस्थान होईल. या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून कपाळी केसरी गंधबुक्का, गळ्यात तुळशीच्या माळा, खांद्यावर भगव्या पताका घेत टाळ मृदंगाचा गजर अन् माऊली नामाचा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या दिंड्या शनिवारी (ता.१०) आळंदीत दाखल झाल्या आहेत.
एकीकडे पावसाने दिलेल्या ओढीने रखडलेल्या पेरण्यांची चिंता आणि दुसरीकडे वारीच्या ओढीने अनेक शेतकरी वारकरी दाखल झाले आहेत.
देऊळवाड्यात गेली तीन दिवसांपासून भाविकांची गर्दी आहे. दर्शनबारीतून दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग इंद्रायणीकाठच्या भक्ती सोपान पुलावरून पुलापलीकडे गेली.माऊलींची ओढ असल्याने संजीवन समाधीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. इंद्रायणीत स्नानासाठी महिला पुरुष भाविकांची दाटी आहे. इंद्रायणीचे पाणी प्रदूषित असल्याने ते कुणी पिऊ नये, यासाठीचे जनजागृतीचे फलकही लावण्यात आले आहेत.
पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे म्हणाले, ‘‘उष्माघातामुळे दर्शनबारीतील वारकऱ्यांना त्रास जाणवू नये, या साठी देवस्थानाकडून शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे शरीराला ऊर्जा देणारी पेय पावडरही देण्याची व्यवस्था केली आहे.
यासाठी खासगी संस्थांकडून मदत मिळाली आहे. दर्शनबारीतील आणि प्रदक्षिणा रस्त्यातील भाविकांना देवूळवाड्यातील प्रस्थान सोहळा पाहता यावा, यासाठी देवस्थानाकडून ठिकठिकाणी स्क्रिनची व्यवस्था केली गेली आहे.’’
पेरणीची चिंता पण वारीचीही ओढ
राज्यभरातून भाविकांचा ओढा आळंदीकडे चालूच आहे. मराठवाडा, कोकण, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून वारकरी दिंड्यांनी तर काही ट्रकच्या माध्यमातून आळंदीत येत आहेत. शनिवारी (ता.९) दुपारनंतर गर्दी वाढू लागली होती.
यंदा उष्माघाताचे संकट असूनही वारकऱ्यांची संख्या वाढलेलीच आहे. त्यात पाऊस नाही. पेरण्या नाहीत. पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ‘वारी झाल्यावर पेरणीचे पाहू’ असे वारीसाठी आलेले शेतकरी बोलत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.