
Sangli District Bank News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९६ वी सर्वसाधारण सभा काल(ता.१६) पद्माळे फाट्यानजीक धनंजय गार्डनमध्ये पार पडली. दरम्यान ही सभा वेगळ्याच विषयाने जोरदार चर्चेत आली आहे. मागच्या तीन महिन्यात राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे.
बहुतांश गावात टँकरद्वारे पाणी देण्यात येत असताना जिल्हा बँकेच्या वार्षीक सभेला सभासदांचे हीत बाजूला ठेवत सभेच्या ठिकाणी चक्क मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आर्केस्ट्राच्या माध्यमातून लावणीच्या गाण्याद्वारे सभासदांचे मनोरंजन करण्यात आले.
यावेळी लावण्यांच्या गाण्यांवर सभासदांनीही जोरदार डान्स केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने तमाशाचा फड आहे की जिल्हा बँकेची सभा असा सभासदांसह जिल्हा वासियांनी सवाल उपस्थित केला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, मोहनराव कदम, विशाल पाटील, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, सुरेश पाटील, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, चिमण डांगे, बी. एस. पाटील, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, अनिता सगरे, सीईओ शिवाजीराव वाघ यांच्यासह आदी उपस्थित होते.
नेत्यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमावेळी उसाला लागलं कोल्हा, मै हू डॉन अशी गाणी लावण्यात आली होती. जिल्हा दुष्काळाच्या यातना सोसत असताना जिल्हा बँकेच्या सभेवेळी झालेल्या प्रकाराने बँकेच्या संचालकांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी नाच गाण्यापेक्षा शेतकऱ्यांवर जो कर्जाचा भार टाकला आहे त्यातला एक टक्का व्याज कमी करा अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान जिल्हा बँकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत येणारा प्रत्येक सभासद उपाशी जाऊ नये म्हणून पंचपक्वानाची सोयही करण्यात आली होती. याचबरोबर सभासदांना जेवण वाढण्यासाठी खास महिलांची सोय करण्यात आली होती. यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना जिल्हा बँकेच्या सभेत अशा गोष्टी होत असल्याने सांगलीकरांनी सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला.
अपघाती मृत्यू झाल्यास विमा संरक्षण
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कर्जाला तीन वर्षांसाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्याची घोषणा अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. शिवाय मृत शेतकऱ्याच्या दोन पाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल. शेतीकर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला.
मयत शेतकऱ्याच्या दोन पाल्यास प्रत्येकी २५ हजारांची मदत
जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्वसाधारण सभेत केली. मयत शेतकऱ्याच्या दोन पाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल.
शेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेली एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच यंदा १०० टक्के कर्ज वसुली केलेल्या सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.