Jalgaon News : सततच्या पावसाने खानदेशात पिकांची आतंरमशाग, तणनियंत्रणाचे काम रखडले आहे. तण वाढत असल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना तणनाशकांचा उपयोग करावा लागत आहे.
आतापर्यंत सोयाबीन, कापूस, मका व ऊस या पिकांत तणांचा नायनाट करण्यासाठी २१ ते २२ हजार लीटर तणनाशकांचा उपयोग झाला आहे. सोयाबीनवर मोठ्या पनांचे तण नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही तणनाशकांचा तुटवडादेखील आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा तणनाशकांचा उपयोग अधिक होत आहे. मजूरटंचाई आहेच. शिवाय मजुरीदेखील अधिक आहे. महिलांना प्रतिरोज १५० ते २०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्यात मध्येच पाऊस येतो आणि वाफसा नाहीसा होतो.
यामुळे अनेकदा मजुरीवरील खर्चही वाया जात आहे. यामुळे शेतकरी तणनाशकांचा सर्रास उपयोग कापूस, सोयाबीन, मका, तूर, ऊस या पिकांत करीत आहेत. या सर्व पिकांत कुठलाही हानी न होता तण नष्ट करणारी तणनाशके बाजारात आहेत.
तसेच बांधावरील तण नष्ट करण्यासाठी ग्लायफोसेटचा उपयोगही वाढला आहे. जळगाव, धुळ्यातील काही भागांत रोजच पाऊस येत आहे. बैलांकरवी फक्त एकदाच व्यवस्थित आंतरमशागत किंवा कोळपण्याचे काम झाले. ६ जुलैपासून मध्यंतरी दोन दिवस वगळात पाऊस सुरूच आहे. भिज व हलका पाऊस येतो.
त्यामुळे वाफसा होत नाही. तण रोज वाढत असून, पिके त्यात दिसेनाशी होत आहेत. यामुळे शेतकरी यंदा तणनाशकांचा अधिकचा वापर करीत आहेत. यंदा सतत पाऊस सुरूच राहिल्यास तणनाशकांची विक्री एक ते सव्वा लाख लीटरपेक्षा अधिक होईल. आजघडीला कोट्यवधी रुपयांच्या तणनाशकांचा विक्री झाली आहे. यंदाची तणनाशकांच्या बाजारातील उलाढाल मागील अनेक वर्षांतील विक्रम मोडेल, असेही चित्र आहे.
यातच कापूस पिकात काही मोठ्या पानांच्या तणनाशकांचा नायनाट तणनाशके वापरूनही होत नाही. लव्हाळा नष्ट होत नाही, अशाही तक्रारी आहेत. सोयाबीनमध्ये मोठ्या पानांचा नायनाट करणाऱ्या स्वस्त दरातील काही तणनाशकांचा तुटवडा आहे.
मध्य प्रदेशातील शेतकरी या तणनाशकांसाठी जळगावात येत आहेत. तर अनेक शेतकरी या तणनाशकांची ऑनलाइन खरेदीदेखील करीत आहेत. एकट्या जळगाव, चोपडा शहरात रोज १२०० ते १३०० लीटर तणनाशकांची विक्री होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.