
Pune Tourism News : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इतिहास, निसर्ग, पर्यावरणाचा (Agri Tourism) रोमांचकारी इतिहास दडलेला आहे. हा इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने पर्यटकांसमोर आणण्यासाठी कौशल्य विकास विभागाद्वारे प्रयत्न केले जातील.
या माध्यमातून ग्रामीण पर्यटन (Rural Tourism) उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन पर्यटन व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषद, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मांजरी आणि भवतालच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ग्रामीण पर्यटन गाइड प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (ता. २८) दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य अधिकारी सोनाली घुले, भवतालचे संस्थापक अभिजित घोरपडे, शिबिराचे समन्वयक पंकज पाटील उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा आणि पर्यावरणाचा मोठा इतिहास आणि वारसा लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाबाबत आणि पर्यावरणाच्या शास्त्रोक्त रंजक माहिती पर्यटकांना स्थानिक प्रशिक्षित गाइड्सद्वारे मिळणे गरजेचे आहे.
यासाठीच्या या शिबिराचे आयोजन अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरासाठी कौशल्य विकास विभागाद्वारे सर्व मदत केली जाईल.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यामध्ये पर्यटनात रोजगार उपलब्धीच्या मोठ्या संधी आहेत. यासाठीचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आले असून, त्याद्वारे २६ ठिकाणे निश्चित केली आहेत.
या ठिकाणांचा खरा आणि शास्त्रोक्त इतिहास आणि माहिती पर्यटकांना देण्यासाठी संबंधित गावांतील ३० तरुणांची निवड करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून ग्रामस्तरीय पर्यटन उद्योजकता विकास करणे शक्य होणार आहे. यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.’’
अभिजित घोरपडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्याला आणि त्यांच्या परिसराला मोठा इतिहास आहे. हा इतिहास आपल्याला माहिती नसल्यास आपण जगाला काय दाखवणार आहोत. आपला परिसर एक्स्प्लोअर करायचा असेल, तर परिसराची खडान् खडा माहिती आपणास हवी.
आपल्या परिसरातील दगडांना देखील मोठा इतिहास असून, त्याच्या निर्मितीचा रोमांचकारी इतिहास आपण जगासमोर आणला पाहिजे. याद्वारे आपला आत्मविश्वास वाढून त्याद्वारे पर्यटन उद्योजकता विकास वाढीला लागणार आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले. स्वागत सोनाली घुले यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.