
ॲग्रोवन वृत्तसेवा
Ashadhi Ekadashi Wari : पंढरपूर, जि. सोलापूर : ‘‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्-सुफलाम् होऊ दे,’’ अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता.२९) येथे व्यक्त केल्या.
‘‘पंढरपूरच्या रस्ते, पाण्यासह मंदिर विकासासाठी २९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याशिवाय आणखी निधी देऊ, निधी कमी पडू दिला जाणार नाही,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे यांनी सपत्निक तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे.
या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले.’’
‘सर्वांना विश्वासात घेणार’
‘‘पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून रस्ते कामासाठी १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे.
तसेच मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल,’’ असे शिंदे म्हणाले.
वाकडीचे काळे दांपत्य मानाचे वारकरी
मुख्यमंत्र्यांसमवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे (वय ५६) मंगल काळे (वय ५२) (रा. वाकडी, ता. नेवासा, जि. नगर) या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला.
काळे दांपत्य २५ वर्षांपासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून मानकरी ठरलेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. हा पास शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास देण्यात आला.
निर्मल दिंडी पुरस्कार वितरण
‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानात नागरिकांचा सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी (ता. आष्टी, जि.बीड) (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडी (ता. हवेली, जि. पुणे) (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, यशवंतनगर, (पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर (५० हजार व सन्मान चिन्ह) यांना प्रदान करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.