Ashadhi Wari 2023 : अवघी पंढरी भक्तिरसाने भारली

Pandharpur Yatra : आषाढी वारीचा मुख्य सोहळा आज (ता.२९) साजरा होत आहे. बुधवारी दुपारपर्यंत सुमारे पाच ते सात लाख वारकरी पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज आहे.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon
Published on
Updated on

Solapur News :

‘अवघीया संता एक वेळ भेटी |

पुंडलिक दृष्टी देखिलिया ||

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक |

विठ्ठलची एक देखिलिया ||

अशी आस मनात ठेवत आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बुधवारी (ता.२८) भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. चोहोबाजूने सुरु असलेला टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी जणू भक्तिरसाने भारून गेली.

आषाढी वारीचा मुख्य सोहळा आज (ता.२९) साजरा होत आहे. बुधवारी दुपारपर्यंत सुमारे पाच ते सात लाख वारकरी पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरा त्यात आणखी वाढ झाली. रखडलेल्या मॅान्सूनने आगमन केल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव आहेत. दोन दिवसांपासून पंढरपूरसह परिसरातही कधी ढगाळ, कधी पावसाची हलकी धार पडत आहे.

Ashadhi Wari
Ashadhi Ekadashi : पंढरपूरात आज डझनभर मंत्र्यांची गर्दी, जाणून घ्या किती वाजता होणार शासकीय महापूजा?

त्यामुळे वारीच्या या सोहळ्यात काहीसे चैतन्य दिसत आहे. शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजनाचे सूर आळवले जात आहेत. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता आदी प्रमुख मार्गांवर तुळशीमाळा, मृदंग, तबला, वीणा आदी भजनी साहित्यांची दुकाने सजली आहेत.

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2023 : संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या वेशीवर

भक्तीचा प्रवाह पंढरीत एक

गेल्या वीस दिवसांपासून सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांचे पालखी सोहळे बुधवारी वाखरीतून पंढरीत दाखल झाले.

त्यामुळे पंढरपुरातील गर्दी सातत्याने वाढतेच आहे. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने प्रदक्षिणा मार्गासह चंद्रभागा तीराकडे निघालेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांमुळे चोहोबाजूंनी भक्तीचा प्रवाह पंढरीत एक होत असल्याचे चित्र आहे.

प्रतिमिनिटाला ४० वारकऱ्यांना दर्शन

आषाढीच्या या वारीमध्ये दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे या स्नानासाठी बुधवारी भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा तीरावर वारकऱ्यांनी एकच गर्दी केली. पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावर पाचव्या शेडच्याही पुढे गेली होती. पदस्पर्श दर्शनाला १८ ते २० तास लागत आहेत. तर प्रतिमिनिटाला ३० ते ४० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com