शहापूर : गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार (Heavy Rainfall) पाऊस पडत असल्याने भातशेती (Rice Farming) संकटात येण्याची भीती आहे. यंदा पावसाने या महिन्यात दमदार हजेरी लावली आहे. यंदाही तालुक्यात किमान ३ हजार हेक्टर क्षेत्रात भात, नागली आणि वरई आदी पिकांची लागवड झाली आहे; दरम्यान भाताच्या पिकांमध्ये दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच अतिपावसाने दाणा भिजण्याची भीतीवजा शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, हा पाऊस असाच सुरू राहिला, तर भातशेती धोक्यात येईल की काय, अशी भीती आहे. तालुक्यात एका दिवसात भातसा धरण क्षेत्रात १४२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे; तर आतापर्यंत तब्बल ३,५५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ८७८ मिलिमीटर पाऊस जास्त पडल्याचे दिसून येत आहे.
त्यातच गेल्या दोन दिवसांत संततधार पडणाऱ्या पाऊसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले आहेत; तर गुरुवारपासून भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सापगाव येथील भातसा नदीला पुलाच्या पातळीपर्यंत पाणी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
हळवे भातपीक धोक्यात
वाडा : तालुक्यातील सर्वच भागांत गेले पंधरा दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात आले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जाणार, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भातपिकाला आलेला फुलोरा खुडून पडत असल्याने भाताचा दाणाच तयार होणार नाही. परिणामी, भातपिकाचे मोठे नुकसान होणार आहे.
पावसाचा मुक्काम असाच कायम वाढत राहिला, तर भातपिकाची संपूर्ण नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.
वाड्यात खोडकिडीने नुकसान
यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने भातपिकांवर रोगांचा प्रादुर्भावाचे प्रमाण ही वाढले आहे. भातपिकांवर पडलेल्या खोडकिड्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर औषधफवारणीचा अधिकचा भार आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनस्तरावरून गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबंधित औषध तत्काळ मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.