पुणे : राज्यात परतीच्या पावसाने (Monsoon Return Journey) जोर धरल्याने दाणादाण झाली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे सध्या सोयाबीन (Soybean), कपाशीसह (Cotton) खरीप पिकांच्या काढणीत (Kharif Crop Harvesting) अडथळे निर्माण झाले आहेत. तर काढणी झालेल्या पिकांचे नुकसान होणार आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बहुतांश भागांना पावसाने झोडपून काढल्याने कापणीस आलेले भात पीक अडचणीत येण्याची शक्यता आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला असतानाच परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण केली आहे. गगनबावड्यासह तालुक्यात झालेल्या पावसाने कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले. कुंभी धरणातून ६०० क्युसेक विसर्ग करावा लागला. हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावामध्ये वीज कोसळून दीड एकरातील ऊस जळाला.
सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पिकांच्या काढणीत व्यत्यय आला आहे. तर द्राक्ष बागांची खरड छाटणी सुरु असल्याने पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. इस्लामपूर, वाळवा, आष्टा, कुंडल शिराळा, मांगले मिरज या परिसरात जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील भरवस, मुडी, मांडळ परिसरात विजांच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस झाला. मांडळ (ता. अमळनेर) येथे शेतात वीज कोसळून शेतकरी जागीच मृत्यूमुखी पडला. तर त्याच्या कुटुंबातील इतर चौघे जखमी झाले.
वाशीम जिल्ह्यात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. यावर्षी पेरणीपासून पावसाने पिच्छा सोडला नाही. सलग दोन ते अडीच महिने पाऊस सुरू होता. त्यातून वाचलेले सोयाबीनचे पीक काढणीला आले. त्यातच ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला. यातच पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे कापणी झालेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील शेलू खुर्द, मंगरूळपीर, पार्डी तड, पोटी या मंडलांत अतिवृष्टी झाली.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील १३ मंडळात अतिवृष्टी झाली. पीक काढणीला आलेल्या सोयाबीन उत्पादकांसह फुटलेला कापूस वेचणी करू पाहणाऱ्या कापूस उत्पादकांची या पावसाने चिंता वाढवली आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाचा खंड, यानंतर झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिकांचा घास घेतला. यानंतर शिल्लक राहिलेल्या सोयाबीन पिकांची कापणी सुरु असताना मागील तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. कापलेले सोयाबीन भिजू नये, या साठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. उमरी तालुक्यातील अस्वलदरी येथे अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. किनवट तालुक्यात किनवट-मांडवा रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने एकजण पुरात वाहून गेला.
शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : रत्नागिरी १२०, कणकवली ७०, मोखेडा, चिपळूण, मुरूड प्रत्येकी ६०, हर्णे, श्रीवर्धन ५०, पेण, लांजा प्रत्येकी ४०, मालवण, वाडा, उरण, कुडाळ, संगमेश्वर, सावंतवाडी प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा १३०, नेवासा १००, कराड, पाचोरा, कर्जत प्रत्येकी ७०, महाबळेश्वर, पाटण, श्रीगोंदा, कवठेमहांकाळ, राधानगरी, इंदापूर प्रत्येकी ६०, करमाळा, हातकणंगले, पाडेगाव, श्रीरामपूर, पन्हाळा, तासगाव, शिरोळ, वाई, जेऊर प्रत्येकी ५०, शिरपूर, जामखेड, कोपरगाव, चोपडा प्रत्येकी ४०, चांदवड, नांदगाव, एरंडोल, राहता, शेगाव, राहुरी, शाहूवाडी, वाळवा, जत, येवला, सातारा, शिरूर, मिरज प्रत्येकी ३०.
मराठवाडा : परांडा १२०, वेजापूर, खुलताबाद, पैठण, गंगापूर प्रत्येकी ६०, आष्टी, निलंगा, रेणापूर प्रत्येकी ५०, औरंगाबाद, शिरूर कासार, सोयगाव प्रत्येकी ४०, चाकूर, उस्मानाबाद, फुलंब्री, जळकोट, हादगाव, बदनापूर प्रत्येकी ३०
विदर्भ : मंगरूळपीर ६०, तेल्हारा ५०, मनोरा, धारणी, दिग्रस प्रत्येकी ४०, बालापूर, नेर, अर्णी, अकोला, अकोट, महागाव, बार्शी टाकळी, चांदूरबाजार, दारव्हा, चिखली, शेगाव, खामगाव, घाटंजी प्रत्येकी ३०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.