Chhatrapati Sambhajinagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिलेला राजीनामा बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसे पत्र विभागीय सहनिबंधकांकडे पाठविल्यानंतर किमान महिनाभरात नवीन अध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी एक ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. श्री. पाटील यांनी बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला. २०१९ पासून अध्यक्ष असलेल्या नितीन पाटील यांनी स्वतंत्रपणे बॅंकेचा कारभार चालवण्यास सुरुवात केल्याने मंत्री अब्दुल सत्तार व संचालक मंडळ त्यांच्यावर कमालीचे नाराज होते.
सोसायटी नोंदणी संदर्भात संचालक आणि अध्यक्ष नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. याचवेळी नितीन पाटील हे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार व संचालकांचे म्हणणे ऐकत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
तेव्हाच सर्वांनी नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. राजीनामा न दिल्यास अविश्वासाचा ठराव आणू, असा इशाराही दिला होता. त्यानंतर दोन ओळींचा राजीनामा लिहून त्यांनी तो बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांच्याकडे पाठविला होता.
या राजीनामा पत्रात १ ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर बँकेच्या चेअरमन/अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे नमूद केले होते. हे पत्र कार्यकारी संचालक/उपाध्यक्ष यांनादेखील पाठवण्यात आले होते. पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सत्तार यांच्यासह १५ संचालकांनी बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांना पत्र दिले होते.
तसेच राजीनामा न दिल्यास ५ ऑगस्टला बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. राज्याचे अल्पसंख्याक, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद मिळालेल्या नितीन पाटील यांच्यावर त्यांची वक्रदृष्टी झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. अब्दुल सत्तार आणि निम्या संचालक मंडळाने अविश्वास दाखवल्यामुळे अखेर नितीन पाटील यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
पाटील यांच्या कार्यशैलीबद्दल मंत्री अब्दुल सत्तार व पंधराहून अधिक नाराज संचालकांनी राजीनामा द्या, अन्यथा अविश्वास ठराव आणू, असा इशारा दिला होता. या संदर्भात पत्रही देण्यात आले होते. श्री पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बँक संचालक तथा पालक मंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह नितीन पाटील बैठकीला अनुपस्थित होते. उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे यांच्यासह इतर संचालकांची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.