
Pune News : सध्या पुणे जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरी पडत आहेत. शुक्रवारी (ता. ८) सकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पावसाचे जवळपास तीन ते सव्वातीन महिने होत आले आहे. या कालावधीत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरीस चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीस सुरुवात झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर १८ जुलैपासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. ३१ जुलैपर्यंत पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि घाटमाथ्यावरही पावसाने चांगलेच थैमान घातले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्क्यांपर्यंत भरली होती. परंतु काही धरणक्षेत्रांत पावसाचे कमी प्रमाण राहिल्याने ५० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती.
परंतु पूर्व भागातील शिरूर, खेड, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर भागांत व जुन्नर व आंबेगावच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस न झाल्याने भूजल पातळी चांगलीच खालावली होती. त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले होते. त्यात वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
यंदा खरिपात एक लाख ७१ हजार २४५ हेक्टर म्हणजेच ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असताना गेल्या एक महिन्यापासून पुणे जिल्ह्यात पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके सुकून चालली होती.
काही ठिकाणी पावसाअभावी वाढ खुंटली गेल्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले होते. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी (ता. ७) सायंकाळपासून वातावरणात चांगलाच बदल झाला. शुक्रवारी (ता. ८) सकाळपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला.
या पावसामुळे दिवसभर ढगाळ वातावरण असून, पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाल्याने भात पिके चांगलीच तरारली आहेत. पूर्व भागातील तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होते.
पवना, आंध्रा धरण शंभर टक्के भरले
आंध्रा आणि पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता पवना नदीमध्ये सकाळी सहा वाजता १४०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व येव्यानुसार सकाळी आठ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून २१०० क्युसेक असा एकूण ३५०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.
तालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका -- पडलेला पाऊस
पुणे शहर -- १०.३
हवेली --- ८.५
मुळशी --- १९.७
भोर --- ३.३
मावळ --- ४९.४
वेल्हे --- ६.८
जुन्नर --- ६२
खेड --- ६०.९
शिरूर -- १०.२
बारामती -- ०.४
इंदापूर -- १.७
दौड --- २.९
पुरंदर --- ०.८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.