परतूर, जि. जालना : रब्बीत ज्वारी, गहू आणि हरभरा (Rabi Chana) हेच पीक शेतकरी घेतात. मात्र काही शेतकरी आता बदल करू लागले आहेत. यंदाच्या हंगामात रब्बीमध्ये शेतकरी राजमासारख्या (Rajma Cultivation) नवख्या पिकाचा प्रयोग करण्यासाठी पुढे आले आहेत. तालुक्यात रब्बी हंगामात किमान ७०० हेक्टर पेरणी (Rajma Sowing) झाली असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे.
एकीकडे रब्बी लागवडीला वेग आला आहे. हरभरा लागवड सर्वाधिक होणार आहे. परंतु काही शेतकरी इतर पिकांचाही प्रयोग करू लागले. राजमा हे पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरत असल्याचा अनुभव गेल्या हंगामात उत्पादन काढलेल्या शेतकऱ्यांकडून सांगितला जात आहे. रब्बीतील इतर पिकांपेक्षा बाजारभावही चांगला मिळत असल्यामुळे या वर्षी काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत या पिकाची लागवड केली आहे.
सध्या रब्बीची लगबग सुरू आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू या पिकांसह काही क्षेत्रावर करडई, सूर्यफूल व इतर पिकांची लागवड होते. बहुतांश शेतकऱ्यांचा कल हरभरा लागवडीवरच आहे. मागील काही वर्षांपासून हरभरा उत्पादनात सातत्याने घट येत आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला. तसेच हरभऱ्याला बाजारात चार हजारांच्या जवळपास भाव मिळत असल्यामुळे खर्चही निघणे मुश्कील आहे.
त्यामुळे शेतकरी इतर पिकांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात रस दाखवत आहे. मागील वर्षापासून तालुक्यात राजमा पिकाने शिरकाव केलेला आहे. राजमा कडधान्यांमध्ये मोडणारे पीक आहे. पोषणतत्त्वे, तसेच कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर आहे.
उत्तरेकडील राज्यात राजमा दैनंदिन आहारात घेतल्या जातो. रब्बीमध्ये ७० ते ८० दिवसांमध्ये हे पीक तयार होत असून काही शेतकरी आठ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. सध्या याचे बाजारमूल्य आठ हजारांवर पोचलेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.