Satej Patil VS Amal Mahadik : आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवत सत्ताधारी महाडिक गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान यावर आता राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्त्यूत्तर दिले आहे. २९ सप्टेंबरला राजाराम कारखान्याची सर्वसाधारण वार्षीक सभा पार पडणार आहे. यावरून विरोधक अनेक मुद्दांवर आवाज उठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अध्यक्ष अमल महाडिक म्हणाले की, ज्यांनी सप्तगंगा कारखान्याचे सहा हजार सभासद एका रात्रीत कमी केले, त्याकारखान्याचे नाव बदलून तो स्वतःच्या नावे केला, त्या आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यावरून सहकारावर बोलणे म्हणजे ही सहकाराचीच चेष्टा असल्याचे महाडिक म्हणाले.
'३० वर्षे आम्ही हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राखला. पुढच्या काळातही सभासदांच्याच मालकीचा ठेवणार, याचे अभिवचन देतो,' असेही त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 'राजाराम'च्या पोटनियम दुरुस्तीवरून आमदार पाटील यांनी टीका केली होती.
त्याला महाडिक यांनी आज उत्तर दिले. कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांनी पोटशूळ उठल्यानेच त्यांनी बेताल वक्तव्य करून सभासदांमध्ये गैरसमज पसरविण्याचा उद्योग सुरू केला आहे.
त्यांच्या कारखान्याचा वार्षिक अहवाल दाखवा आणि १ लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जा, आम्ही विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे द्या, असे आव्हान अनेकदा दिले. आजअखेर त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसून अहवालाचे पानही बघायला मिळालेले नाही. एकीकडे, सहवीज निर्मिती प्रकल्प का उभारला नाही, आधुनिकीकरण का केले नाही, म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे अशा प्रकल्पांना विरोध करायचा, ही त्यांची कूटनीती सभासद ओळखत असून, या अपप्रचाराला ते बळी पडणार नाहीत.
साखर आयुक्तांनी सहवीज निर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरण करण्याच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देत असताना स्व भाग भांडवल उभारणीबाबत अट नमूद केल्याने भाग भांडवल उभारणीसाठी वाढीव शेअर्स करणे आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
प्रकल्प उभारणीनंतर वाढीव गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याला भौगोलिकदृष्टया संलग्न असलेल्या नवीन गावांचाच यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सदर यादीमध्ये करवीर तसेच हातकणंगले तालुक्यातील गावेही समाविष्ट असल्याचे आपणाला दिसून येईल परंतु या दोन तालुक्यातील गावांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे आणि कार्यक्षेत्रा लगतच्या सांगली जिल्ह्यातील गावांवर बोलून जाणूनबुजून सभासदांची दिशाभूल करण्यासाठी सतेज पाटील राजकीय हेतूने प्रेरित होऊन टीका-टिप्पणी करत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.