
Chhatrapati Sambhajinagar News : आधीच उशिराने पेरणी झाली. त्यात आतापर्यंत पावसाचे ३ ते ६ प्रदीर्घ खंड अनुभविलेल्या मराठवाड्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची वेळ येईल, तेव्हा पावसाचा खंड नियमच घात करण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी २१ दिवसांपेक्षा कमी दिवस खंड, मात्र टप्प्याटप्प्याने पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पीकविमा परताव्यासह नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आवाज उठविला जातो आहे.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत पीकविमा परताव्याच्या अटीच्या अधीन राहून निघणाऱ्या अग्रिमसंबंधी अधिसूचना काढल्या गेल्या व जात आहेत. खरिपात सोयाबीन व कपाशी या दोनच पिकांनी जवळपास मराठवाड्यातील खरिपाचे ८० टक्के क्षेत्र व्यापले आहे.
उर्वरित सर्व २० टक्के क्षेत्रावर इतर खरीप पिके आहेत. यंदा जूनच्या मध्यानंतरच सुरू झालेली पेरणी जुलै अखेरपर्यंत चालली. त्यात ५३ टक्के शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या व पावसाला अतिसंवेदनशील असलेल्या सोयाबीनसारख्या पिकाला आवश्यकतेवेळीच पावसाने प्रदीर्घ खंडाचा घात केला.
२१ दिवसांच्या पुढे पावसाचा खंड पडलेल्या मंडळाविषयीच अधिसूचना काढल्या गेल्या व जात आहेत. दुसरीकडे विमा कंपन्या याविषयीच्या बैठकांमध्ये नियमांवर बोट ठेवताहेत. नियमाप्रमाणे २.५ मिलिमीटर पाऊस पडला की तो पावसाचा दिवस गणला जातो.
प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्यांत ३ ते ६ पर्यंतच्या खंडात ७ ते ३७ दिवसांपर्यंत पावसाचे खंड अनुभवल्या गेले. १० ते १२ दिवस खंड त्यानंतर २.५ मिलिमीटर किंवा पिकाला पोषक नाही. मात्र तो खंड तोडणारा ठरला. त्यामुळे पिकाची जी वाताहत व्हायची ती झाली. अशा वाताहत झालेल्या पीक क्षेत्राची संख्या मोठी आहे.
त्यामुळे सरसकट पीकविमा परतावा किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची गरज आहे. दुसरीकडे पिकाला पोषक नसलेल्या, मात्र पडून पावसाचा खंड तोडत पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात अडचण निर्माण करणाऱ्या पावसाच्या प्रमाणाविषयीच्या नियमात शासन बदल करेल का, हा प्रश्न आहे.
सोयाबीन, कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार
मराठवाड्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १९ लाख ५० हजार हेक्टर आहे. या तुलनेत जवळपास १३० टक्के क्षेत्रावर म्हणजे २५ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली.
दुसरीकडे कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ४४ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या ८९ टक्के म्हणजे १३ लाख ६७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. मराठवाड्याच्या एकूण खरीप क्षेत्राच्या ५३ टक्के क्षेत्रावर सोयाबीन, तर २८ टक्के क्षेत्रावर कपाशी पीक आहे.
सोयाबीनला कुठे फुले लागण्याच्या, कुठे शेंगा लागण्याच्या, तर कुठे शेंगा पक्वतेच्या अवस्थेत प्रदीर्घ खंडाला सामोरे जावे लागले. कपाशीलाही वाढीच्या, पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत प्रदीर्घ खंडाला सामोरे जावे लागले. अत्यंत गरजेच्यावेळी पावसाच्या दांडीमुळे या दोन प्रमुख पिकांच्या उत्पादनात बहुतांश भागात ५० ते ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.