
जळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी (Rabbi Sowing Khandesh) १३५ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी १७० टक्क्यांवर राहू शकते. धुळे व नंदुरबारातील पेरणीदेखील (Dhule Nandurbar Rabi Sowing) १०० टक्क्यांवर असणार आहे.
यंदा पाऊस चांगला झाला आहे. रब्बी पेरणी काही भागात झाली आहे. परंतु काही भागांत पावसामुळे पेरणीत व्यत्यय येत आहे.
कांदा लागवडही वाढणार आहे. हे क्षेत्र लक्षात घेता पेरणी आणखी वाढेल, असे सांगितले जात आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे.
परंतु जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे दीड लाख हेक्टरवर होईल. धुळ्यात सुमारे ३८ हजार हेक्टर एवढे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पण तेथेही पेरणी ४० हजार हेक्टरवर होईल. नंदुरबारात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर असून, तेथेही पेरणी ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल. जळगाव जिल्ह्यातील पेरणीसंबंधीची अंतिम माहिती संकलित केली जात आहे.
खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित आहे. त्यापाठोपाठ तृणधान्यांची पेरणी होईल. मक्याची लागवड कमी झाली राहू शकते. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर मका पीक असणार आहे. गेल्या वर्षी ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मक्याची लागवड झाली होती.
लष्करी अळी, कमी उत्पादन, अधिकचा खर्च व कमी दर यामुळे मका लागवडीवर परिणाम दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर झाली होती. पाणी मुबलक असल्याने गिरणा, हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रातील पेरणीदेखील १०० टक्क्यांवर जळगाव जिल्ह्यात असणार आहे. धुळ्यातील शिरपुरातही अनेक धरणांतून रब्बीसाठी पाणी सोडले जाईल. यामुळे पेरणी १०० टक्क्यांवर राहील, हे निश्चित आहे.
कोरडवाहू रब्बी ज्वारी, हरभरा पेरणी दसरा सणालाच खानदेशात सुरू होते. परंतु यंदा पावसामुळे वाफसा नव्हता. पूर्वमशागतीला विलंब झाला. यामुळे पेरणी लांबली आहे. काळ्या कसदार जमिनीत हरभरा पीक अधिक असते. त्याचे उत्पादनही एकरी सात ते आठ क्विंटल मागील हंगामात आले होते. यंदाही हरभरा पेरणीसंबंधी शेतकऱ्यांचा कल आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.