
औरंगाबाद : खरिपात मोठ्या प्रमाणात नुकसान (Kharif Crop Damage) झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या साऱ्या आशा रब्बीवर (Rabi Season) आहेत. मात्र आधीच पेरणीला (Sowing) रान तयार करताना नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना कशीबशी पेरणी करणे सुरू ठेवले आहे. मात्र विजेच्या (Electricity) खेळखंडोब्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रब्बीच्या आशेलाही सुरुवातीलाच घरघर लागली आहे.
खरिपातील पेरणी झालेल्या ४९ लाख हेक्टरपैकी ३२ लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचे सरकार दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर टिकून आहेत. अतिपावसामुळे शेतकऱ्यांना रब्बीसाठी रान तयार करताना मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडली.
रान तयार केल्यानंतर ओल तुटली, तुटलेल्या ओलीमुळे रान भिजवूनच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परंतु नेमका त्याचवेळी विजेने खोडा घातल्याने रब्बीचीही परवड सुरू झाली आहे. जिथं दसऱ्यात ज्वारीची पेरणी केली जायची तिथं अजूनही रान ओलवून पेरणी करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
रोहित्र जळाले तर ते पुन्हा स्थापित करण्यासाठी गरज असलेल्या शेतकऱ्यांनाच आर्थिकसह सर्व त्रास सहन करून रोहित्र बसविण्याची वेळ येते. सरकार कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नका म्हणत असले, तरी प्रत्यक्षात आदेशाविना काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
ऐन गरजेच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने किंवा पुरवठा केली जात असलेली वीज अपेक्षित दाबाने होत नसल्याने टिकत नाही. त्यामुळे पेरलेल्या पिकांना पाणी देणे काही भागात दुरापास्त, तर काही भागात कमालीच्या कसरतीचे बनले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिवावर उदार होऊन रात्रीचं पाणी
काही भागांत आठवडाभर रात्री व आठवडाभर दिवसा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. दिवसा होणारा वीजपुरवठा टिकतच नाही. काही ठिकाणी सिंगल फेजही वीजपुरवठा टिकत नसल्याची स्थिती आहे.
त्यामुळे आज द्यावयाचे पाणी किमान आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळाने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. रात्री मिळणारी वीज बरी टिकते परंतु प्रचंड थंडी अन् जिवाचा धोका पत्करून आपले शेत भीजविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अनेक अप्रिय घटना घडलेल्या असतानाही शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी काही पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.