
पुणेः बासमती भात पिकामध्ये रसायनांचा वापर कमी करण्यासाठी पंजाब सरकारने पुढाकार घेतला आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. भारतातून पाठवण्यात आलेल्या बासमती तांदळात किटनाशकांचे अवशेष आढळल्याने आयातदार देशांनी हा तांदूळ नाकारला होता. त्यामुळे सावध झालेल्या पंजाब सरकारने भात पिकामध्ये तणनाशक, कीडनाशक आणि किटकनाशकांचा वापर कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पंजाबमध्ये बासमती भाताची लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. बासमती भाताची काढणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होईल. सध्या भाताचे पीक चांगल्या स्थितीत आहे. भातशेतीत रसायनांचा वापर कमी व्हावा, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भात पिकावर कीड-रोग आणि तणांचा प्रादुर्भाव झाल्यास कोणती पर्यायी संयुगे वापरावी याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी राज्याचा कृषी विभाग आणि पंजाब कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी सल्ला व मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहेत .
पंजाबचा बासमती तांदूळ (Panjab's Basamti Rice) उत्तर अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये निर्यात (Basamati Rice Export) होतो. भारताने गेल्या वर्षी ४० हजार कोटी रूपये किमतीचा बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) केला होता. त्यात एकट्या पंजाबचा वाटा ४० टक्क्यांहून जास्त होता. मात्र किटकनाशकाचे (Pesticide) अवशेष आढळल्यामुळे बासमती तांदूळ नाकारल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे पंजाब कृषी विभागाने (Department Of Agriculture Panjab) १० प्रकारच्या कृषी रसायनांवर बंदी (Ban On Agriculture Chemicals)घातली होती. त्यात तणनाशके, कीडनाशके आणि किटकनाशकांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या १९६८ च्या किटकनाशक कायद्यानुसार, राज्य सरकार ६० दिवसांसाठी बंदी घालू शकते, त्यानंतर ती आपोआप उठवली जाते. केंद्राच्या खत व रसायने मंत्रालयाला कायमस्वरूपी बंदी घालण्याचा अधिकार आहे.
यासंदर्भात पंजाबचे कृषी संचालक गुरविंदर सिंग म्हणाले की, आम्ही पिकांवर रासायनिक कीडनाशके आणि किटनाशक वापराविरोधात लढत आहोत. पिकांवर रसायनांचा वापर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात पंजाब कृषी विद्यापीठ आणि बासमती निर्यातदारांची बैठक लवकरच होणार आहे.
पंजाबमध्ये मागील खरीप हंगामात बासमती भाताखाली ४.३० लाख हेक्टर क्षेत्र होते. यंदा मात्र बासमतीची लागवड वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा ५ लाख हेक्टरवर बासमती तांदूळ लागवड होऊ शकते. आतापर्यंत ४.७५ लाख हेक्टरवर बासमतीची लागवड झाल्याचे पंजाब कृषी विभागाने म्हटले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.