
Millet Production मुंबई : तृणधान्य उत्पादक आणि खरेदीदारांना एकत्र आणण्याबरोबरच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हमखास बाजारपेठ (Millet Market) उपलब्ध करून देण्यासाठी तृणधान्य महोत्सवात (Millet Festival) ११ सामंजस्य करार करण्यात आले.
‘मिलेट मिशन’मुळे (Millet Mission) आगामी काळात उत्पादन वाढल्यास तृणधान्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, खरेदीदारांनाही मालविक्रीची हमी मिळावी, यासाठी पणन महासंघाने पुढाकार घेत हे करार केले आहेत.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त सध्या महाराष्ट्रात तृणधान्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती सुरू आहे.
सध्याच्या परिस्थितीत मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. तृणधान्यांचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त तर काही ठिकाणी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने दर जास्त अशी परिस्थिती आहे.
सावा, कोदो, भगर, कुटकी यांना मागणी आहे. पण त्यांचा पुरवठा पुरेसा होत नाही. ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा पुरवठा होतो मात्र, नेमका ग्राहक कुठे आहे, हे कळत नाही, असे पणन महासंघाचे निरीक्षण आहे.
ही विस्कळित साखळी सुरळीत करण्यासाठी या महोत्सवानिमित्त पणन महासंघाने पुढाकार घेत राज्यातील ११ संस्थांशी सामंजस्य करार केले. यात सहा संस्थांसोबत पणन महासंघाने करार केला आहे.
तर ‘महाएफपीसी’सोबत उत्तर प्रदेशच्या एका शेतकरी उत्पादक कंपनीने करार केला आहे. उर्वरित चार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खासगी शेतकरी उत्पादक कंपन्यांशी करार केले आहेत.
या करारांच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची साखळी बळकट होईल, असा विश्वास पणन महासंघाला आहे. तृणधान्याबाबत होणाऱ्या जागृतीमुळे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात तृणधान्य उत्पादन वाढेल, असा कृषी विभागाचाही अंदाज आहे.
असे झाल्यास भाव कमी होण्याबरोबरच दलालांची साखळी बळकट होण्याचा धोका असल्याने त्यांची आधीच काळजी घेण्यासाठी हे करार केले आहेत.
‘‘तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर आणि ग्राहकांना माफक दरात उत्पादने देण्यास हे करार उपयुक्त ठरतील. तृणधान्यांचा ग्राहक हा शहरी असल्याने त्यांना पणन महासंघाकडून उत्पादने उपलब्ध करून देणे, तांदूळ आणि गव्हासारख्या धान्यांना पर्याय देणे आदी उद्दिष्टे ठेऊन हे करार झाले.
शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याबरोबरच ग्राहकांना चांगल्या प्रतीची उत्पादने देण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत,’’ असे पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुग्रीव धपाटे यांनी सांगितले.
पणन महासंघातर्फे खुल्या बाजारापेक्षा चांगल्या दरात शेतीमाल विकत घेतला जाईल. त्यामुळे खात्रीशीर खरेदीदार तयार झाला की आपोआप उत्पादनही वाढेल. सध्या ग्राहकांची ऑनलाइन खरेदीतून होणारी फसवणूक थांबविण्याचा आमचा मानस आहे.
- डॉ. सुग्रीव धपाटे, व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ.
पणन महासंघाशी करार केलेल्या कंपन्या (कंसात पिके)
१. कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रो. को. लि., नगर (बर्टी, राळा, वरई)
२. मेळघाट फार्मर प्रोड्युसर कंपनी, चिखलदरा (कुटकी, सावा, कोदो, ज्वारी)
३. शिवाई फार्मर्स प्रोड्युसार कंपनी (नाचणी)
४. गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी (नाचणी)
५. भुदरगड नॅचरल फार्मर प्रोड्युसर कंपनी (नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई)
६. लोक संचलित साधना केंद्र, खेड, रत्नागिरी (नाचणी)
गुड टू ईट समृद्धी ॲग्रोव ग्रुप, राहुरीचे करार
१. कळसूबाई ट्रायबल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (सावा, राळा, ज्वारी, नाचणी)
२. टेंडर ग्रे एलएलपी, नाशिक (ज्वारी, बाजरी, नाचणी)
३. मिस्टी एफपीसी, जळगाव (ज्वारी)
४. मेळघाट एफपीसी (कोदो, सावा, राळा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.