Millet Year 2023 : पौष्टिक तृणधान्य विक्रीसाठी ‘जागर’ ब्रॅण्ड

‘सहकार, पणन’चे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्याशी संवाद
Millet Year 2023
Millet Year 2023Agrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील

Millet : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त (Millet Year) राज्य पणन विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashwantrao Chavan Foundation) येथे २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव होईल.

यात उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग कंपन्यांनाही निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल.

या पार्श्वभूमीवर सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्याशी संवाद साधला. ‘‘‘जागर मार्केटिंग फेडरेशन’च्या ब्रॅण्डमधून तृणधान्यविषय जागृती महाराष्ट्रभर पोहचेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रश्‍न : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आपल्याला महाराष्ट्रातून काय अपेक्षित आहे?

उतर : महाराष्ट्र हे प्रमुख तृणधान्य उत्पादक राज्य आहे. केवळ बाजरी नव्हे तर, ज्वारी, नाचणी, रागी यांसारखी पिकेही मोठ्या प्रमाणात येथे घेतली जात होती. या पिकांचे केवळ उत्पादनच नव्हे, तर ही धान्ये रोजच्या आहारात होती.

मात्र, जेव्हा हरितक्रांती झाली, त्यानंतर गहू आणि मोहरी मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात आले. अत्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक धान्ये आपल्या खाद्यसाखळीतून नाहिशी झाली. त्याचा परिणाम असा झाला की ही पिके शेतातूनही कमी झाली.

रोख उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याचाही परिणाम तृणधान्याच्या लागवडीवर झाला. त्यामुळेच महाराष्ट्रातील तृणधान्य लागवडीचे क्षेत्र वाढविणे, उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे आणि ग्राहकांना वाजवी दरात ही उत्पादने मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे.

Millet Year 2023
Millet Diet : तृणधान्य आहार चळवळीला व्यापक स्वरूप

प्रश्‍न : सरकारी पातळीवर कोणत्या विभागांचा समावेश आहे आणि पणन विभाग यात काय भूमिका बजावत आहे?

उत्तर : निरोगी जीवनशैलीसाठी आवश्‍यक धान्य कमी होत चालल्याने २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर तृणधान्य वर्ष साजरे केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसभेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याबाबत प्रस्ताव दिला होता.

त्याला ७२ देशांनी पाठिंबा दिला. आता हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यात पणन, कृषी, महिला व बालविकास, ग्रामविकास आदी विभाग हे वर्ष साजरे करत आहेत. उत्पादकांना चांगली किंमत मिळत नाही.

ग्राहकांना तृणधान्यांची उत्पादने महाग मिळतात. उत्पादक ते ग्राहक या साखळीत मोठा विस्कळितपणा आहे. ही साखळी ना शेतकऱ्याच्या फायद्याची, ना ग्राहकाच्या सोयीची.

त्यामुळे ही उत्पादने मध्यवर्गीय ग्राहकांना परवडेल, अशा दरात उपलब्ध होतील, ही गरज ओळखून ‘मार्केटिंग प्लॅन’ तयार केला आहे. तृणधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांची विक्री तीन दिवस केली जाईल.

प्रश्‍न : तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार काय करेल ?

उत्तर : या शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही बाजार समित्यांना सूचना केल्या आहेत. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक आहे, तेथे वाजवी दरात ही धान्ये उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना केल्या आहेत.

मार्केटिंग फेडरेशन आपला स्वत:चा जागर नावाचा ब्रँड तयार करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्थांशी फेडरेशन संपर्क करत आहे. शहापूर, वाडा, विक्रमगड, मेळघाट, चिखलदरा, नंदूरबार जिल्ह्यातील काही क्षेत्र, कोल्हापूर जिल्ह्यातील नाचणीचे क्षेत्र, लातूर, उस्मानाबाद, जालना ही क्लस्टर निश्चित केली आहेत.

केवळ ज्वारी आणि बाजरीसाठी काम करत नसून जी आरोग्यासाठी खूप जास्त उपयोगी आहेत, अशी तृणधान्य आम्ही केंद्रस्थानी आणणार आहोत.

प्रश्‍न : या महोत्सवाचे स्वरूप कसे असेल ?

उत्तर : महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीबरोबर मार्केटिंग फेडरेशन काही कंपन्यांसोबत करारही करेल. मी स्वत: सादरीकरण करणार आहे. तसेच आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर मार्गदर्शन करतील. ‘मिलेट मॅन’ खादर वली हे मार्गदर्शन करतील.

मध्यमवर्गीय लोकांत यांची मागणी वाढावी, यासाठी हा महोत्सव मार्गदर्शन करेल. उत्पादकांना योग्य भाव देणे, माहिती प्रसार करणे, उत्पादक कंपन्यांचा शेतकऱ्यांशी जोडणे आणि उत्कृष्ट पदार्थ निर्मितीसाठी साहाय्य करणे, सार्वजनिक संस्थांद्वारे मार्केटिंग करून माफक किमतीत उत्पादने उपलब्ध करून देणे ही आमची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे या महोत्सवातून साध्य होतील, असा विश्वास वाटतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com