Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

लोकांचे दैनंदिन प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य द्या

कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा या विषयी महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या.

मुंबई : ‘‘राजकारण (Maharashtra Politics) आणि पाऊस (Rain) यांची नेहमीच अनिश्‍चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील. पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे, असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांनी दिल्या. ‘‘जनतेशी संबंधित महत्त्वाची कामे थांबवून ठेवू नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या,’’ असेही निर्देश त्यांनी दिले.

सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा या विषयी महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीस मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच अन्य विभागांचे सचिव उपस्थित होते.

Udhhav Thackeray
एकनाथ खडसेंच्या  बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा 

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. ‘‘कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहोचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,’’ असे श्री. ठाकरे म्हणाले.

Udhhav Thackeray
समोर या, मी राजीनामा तयार ठेवलाय : उद्धव ठाकरे

राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. ‘‘राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आहे. राज्यात साधारणतः २५ हजार रुग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पाच टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनवर एक टक्का, तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटिलेटरवर आजमितीस २५ रुग्ण आहेत. वर्धक मात्रा वाढविण्याची गरज आहे.’’

मुंबई महापालिकेचे प्रशासक डॉ. आय. एस. चहल म्हणाले, ‘‘मुंबईत दररोज २० हजारांवर चाचण्या करण्यात येत आहेत. आज २४७९ रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या १३ हजार ४०० इतकी आहे. मुंबईत सध्या १२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.’’
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत देखील मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. या वेळी विशेषतः कोकण विभागातील तयारी आणि सज्जता या बाबत कोकण विभागीय आयुक्तांनी माहिती दिली. दरड प्रवण नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीसंबंधी सूचना श्री ठाकरे यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेऊन ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘वारकऱ्यांची काळजी घ्या’

आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करावी. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा या बाबतीत जाणीवपूर्वक काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘पेरण्यांबाबत मार्गदर्शन करा’

राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात १३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच सुमारास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे, खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी २५ जून ते १जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आयोजित करण्यात आला आहे, असे डवले यांनी या वेळी सांगितले. पावसाची अनिश्‍चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com