Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी तालुकानिहाय आराखडे तयार करा

राज्यातील पौष्टिक तृणधान्य पीक क्षेत्राला चालना देण्यासाठी या पिकांचे तालुकानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत.
Cereals
CerealsAgrowon

पुणे ः राज्यातील पौष्टिक तृणधान्य पीक (Cereal crop) क्षेत्राला चालना देण्यासाठी या पिकांचे तालुकानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी दिले आहेत. आगामी २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे होत आहे. त्यामुळे यासंबंधी देशभर वर्षभर उपक्रम होणार असून, त्यात महाराष्ट्र आघाडीवर असावा, यासाठी आयुक्तांनी हालचाली सुरू केल्या आहे.

Cereals
Sugar Production : जगात यंदा साखर उत्पादन वाढणार

कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्याकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. वर्षभर या पिकांसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समावेश असलेला महिनानिहाय कृती दर्शविणारे आराखडे तयार व्हावेत, असा प्रयत्न श्री. पाटील यांच्याकडून सुरू आहे.

जिल्हा व तालुकास्तरीय अशा दोन भागांमध्ये आराखडे तयार होतील. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कार्यशाळांचे वर्षभर चालणारे उपक्रमदेखील ठरविले जातील. पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे. त्यासाठी बियाणे वाटप, प्रात्यक्षिके, शेती तेथे पौष्टिक तृणधान्य संकल्पनेंतर्गत मिनीकिट वाटप, बीजोत्पादन शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण तसेच अधिकारी प्रशिक्षण असे उपक्रम महिनानिहाय उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात निश्‍चित होणार आहेत. या पिकांचे जिल्हानिहाय कृषी महोत्सवदेखील घेतले जाणार आहेत.

Cereals
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षात कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतांवर भेटी द्याव्यात व प्रयोगशील शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याबाबत नियोजन करावे. पौष्टिक तृणधान्य वर्ष उपक्रमात कृषी व्यक्तिरिक्त इतर विभाग व बिगर कृषी उपक्रमदेखील करावेत. यात आहारतज्ज्ञांची व्याख्याने, शाळांमध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, महिला बचत गटांचे कार्यक्रम, पाककला स्पर्धा, नगरपालिका क्षेत्रात शाळा, आरोग्यकेंद्रे येथे प्रचार करावा, महिलांचे बचत गट, नव-उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळा घ्याव्यात, असेही आयुक्तांनी सुचविले आहे.

संलग्न घटकांची माहिती संकलित होणार

पौष्टिक तृणधान्य पिकांशी संबंधित सर्व संलग्न घटकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. यात प्रगतिशील शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृषी विद्यालये व महाविद्यालयांमधील तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योगा तज्ज्ञ, जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी, प्रक्रियाधारक, निर्यातदार, महिला बचत गटांचे प्रमुख तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश असेल, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com