Nandurbar Water Crisis : टंचाईस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास प्राधान्य
Nandurbar News : गेल्या वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी कमी असून, टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, तसेच टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मंगळवारी (ता. १) आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तसेच सर्व तालक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, ‘‘सर्वसाधारणपणे नंदुरबार जिल्ह्यात जून ते जुलै या कालावधीत गेल्या वर्षी ८५.४ टक्के पाऊस झाला होता, चालू वर्षी तो ७६.९ इतका झाला आहे. तालुकानिहाय नंदुरबार ५० टक्के, नवापूर ७५.७, शहादा ६०.३, तळोदा ११०.३, अक्राणी १०९.२, अक्कलकुव्यात ९८.६ इतका पाऊस झाला असून, येणाऱ्या काळात काही तालुके व गावांमध्ये पाऊस न पडल्यास टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
त्यामुळे रोजगार हमीतून कामे, मुबलक चारा व प्रत्येक शेतकरी, वनपट्टेधारक हा विमाधारक कसा होईल यासाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.’’तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्य व कापूस, ऊस यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
बियाणे व खत दुकानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडचण करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. प्रसंगी परवाना रद्द करण्यात यावा.जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत एकही व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. अमृतमहोत्सवी वर्षात १०० टक्के घरकुलांचे स्वप्न साकार करण्याचा मानसही या वेळी डॉ. गावित यांनी व्यक्त केला.
हे निर्णय झाले
वनपट्टेधारकांना देणार ऑफलाइन पीकविमा.
टंचाईच्या परिस्थितीत पेयजलास सर्वोच्च प्राधान्य.
एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन करणार.
रोहयोची कामे, मुबलक चारा आणि ९० टक्के पीकविमा या त्रिसूत्रीवर टंचाईचे नियोजन.
१५ ऑगस्टपर्यंत मागेल त्याला घरे देणार.
वादळी वारा, अवकाळी पावसाने जून महिन्यात झालेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई देणार.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.